शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अद्वितीय व्यक्तीमत्त्वाचे त्यांच्या निकटवर्तियांनी उलगडलेले पैलू

आज १५ नोव्हेंबर २०२२ या दिवशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रथम पुण्यस्मरण (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…

श्री. बाबासाहेब पुरंदरे

आज १५ नोव्हेंबर २०२२ या दिवशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. बाबासाहेब यांचे कर्तृत्व वादातीत होते. त्यांनी ‘शिवचरित्र’ ग्रंथाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगासमोर मांडला. त्यांनी ‘जाणता राजा’ या महानाट्याची निर्मिती करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोचवला. त्या निमित्ताने दिवंगत पु.ल. देशपांडे आणि अन्य मान्यवर, तसेच लेखक यांनी त्यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार, इतिहास संशोधक अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी उलगडलेले त्यांच्या जीवनातील विविध पैलू आमच्या वाचकांसाठी त्यांच्याच शब्दांत देत आहोत.

बाबासाहेबांचे जाज्वल्य विचार

‘‘नुसता घराणेदार वेश परिधान केला, जुन्या पगड्या घातल्या म्हणजे वारसा सांगता येत नाही. वारसा चालवणं म्हणजे पूर्वजांच्या कामासारखं वा त्याहूनही सरस समाजोपयोगी चांगले काम करणे. हे असे काम जे कुणी करते, तेच खरा वारसा सांगू शकतात. केवळ पूर्वासुरींच्या नावाने मोठेपणा घेऊन वारसा सांगता येत नाही ! छत्रपती शिवाजी महाराज जे काही जगले, त्यांच्या जीवनातील जे काही सार आहे, ते आज आम्हाला हवे आहे. आजचे जीवन हे प्रेरक आणि कृतीपूर्ण जगण्यासाठी ते सार आम्हाला आणि आमच्या येणार्‍या पुढील पिढ्यांना मिळो. हे सर्व सांगणारे कीर्तनकार आम्हाला मिळोत, डफावर थाप मारून ते वर्णन करणारे उत्तम शाहीर आम्हाला मिळोत, उत्तम कलाकृती अंगी बाणलेले कलाकार आम्हाला लाभोत, जेणेकरून आमच्या राष्ट्राची पाऊले पुढे पडतील!’’- नंदन वांद्रे

(साभार : स्मृतिग्रंथ ‘सोनचाफा’)

बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची इतिहासाला नोंद घ्यावीच लागेल आणि त्यांचा मार्ग पत्करून त्यांचे कार्य पुढे न्यावे लागेल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलक्ष्मीचा संसार भगव्या झेंड्यासमवेत चालला पाहिजे, अशी सत्ता, समाज आणि राष्ट्र उभे केले पाहिजे, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. हा संदेश उगवत्या पिढीच्या प्रत्येक तरुणाचे हृदय, बुद्धी आणि अंत:करणापर्यंत नेण्याचे कार्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले आणि या संदेशाप्रमाणे त्यांनी स्वतःचे जीवन व्यतित केले. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची इतिहासाला दखल घ्यावीच लागेल आणि त्यांचा मार्ग पत्करून त्यांचे कार्य पुढे न्यावे लागेल, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. भारतात हिंदू आणि हिंदुत्व जिवंत ठेवायचे असेल, तर छत्रपतींचा इतिहास लिहिला आणि वाचला पाहिजे. जशी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध तसाच छत्रपतींचा इतिहास आहे. त्या इतिहासात मातृऋण, देशऋण फेडण्याचे बळ आहे. बाबासाहेब हिंदुस्थान आणि हिंदु समाज यांच्यासाठी जगले. ज्यांना ‘आपला देश, संस्कृती, परंपरा परकियांच्या दाढेतून मुक्त करून स्वाभिमानपूर्वक ‘राष्ट्र’ म्हणून उभे रहावे’, असे वाटत असेल, त्यांना बाबासाहेबांनी लिहिलेला शिवचरित्र ग्रंथ उपयोगी पडणार आहे.

बाबासाहेबांचे इतिहास लेखन सत्याला धरून ! – मोहन शेटे, संस्थापक-अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ

बाबासाहेबांची स्मरणशक्ती अतिशय विलक्षण होती. त्यामुळे त्यांनी छत्रपतींचा इतिहास वार, दिनांकासह जसा घडला तसा इत्थंभूत मांडला. छत्रपतींचा इतिहास हा अवघड, जड, अनाकलनीय शब्दांमध्ये बंदिस्त होता. तो बाबासाहेबांनी सोपा, सहज रूजेल, रसाळ, रंजक आणि अगदी सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांमध्ये गुंफला. त्याची प्रेरणा त्यांना संतांच्या ग्रंथांतून मिळाली. त्यांनी ‘राजा शिवछत्रपती’ आणि इतरही ग्रंथांमध्ये ऐतिहासिक संदर्भ, पुरावेही दिले आहेत. छत्रपती ज्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी बाबासाहेब प्रत्यक्ष गेले. अनेक सरदार, जहागीरदार, वतनदार अशा अनेक मावळ्यांच्या घरी जाऊन उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांचे इतिहास लेखन सत्याला धरून आहे.

बाबासाहेबांनी त्यांचे गुरु दत्तो वामन पोतदार यांचे ‘शिवचरित्र’ लिहिण्याचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण केले ! – चेतन राजहंस, राष्ट्र्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

स्वातंत्र्यापूर्वीची आणि स्वातंत्र्यानंतरची १० वर्षे हा काळ ताठ मानेने जगणार्‍या शिवछत्रपतींच्या तिरस्काराने भरलेला होता. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘वाट चुकलेले देशभक्त’ आणि ‘लुटारू’ असे म्हटले होते. तशी नोंद त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात आहे. त्या काळात इतिहासाच्या सत्याचा भंग झाला होता. वर्ष १९५८-५९ च्या काळात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत इतिहास पुराव्यासहित असलेले ‘शिवचरित्र’ प्रसिद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज ‘वाट चुकलेले’ देशभक्त नव्हे; तर ते ‘वाट दाखवणारे महापुरुष’ आहेत, हे त्यांनी सिद्ध केले. बाबासाहेब यांचे कर्तृत्व वादातीत आहे. सनातन संस्थेशी त्यांचे आत्मीय संबंध होते. त्यांचे गुरु दत्तो वामन पोतदार यांचे ‘शिवचरित्र’ लिहिण्याचे अपूर्ण राहिलेले कार्य बाबासाहेबांनी पूर्ण केले.

१. आमच्या गंजू पहाणार्‍या मनांना शिवशाहीर बाबासाहेबांनी मानाने जगण्याचा अर्थ शिवचरित्रातून उलगडून दाखवला !

‘ज्या राज्यात अन्यायाचा नि:पात होईल; पापी माणसाला शासन होईल; शीलाचा सन्मान होईल; चारही धामांच्या तीर्थयात्रा सुखरूप पार पडतील; ज्याचा जो देव, त्याची उपासना तो तो निर्वेधपणे (निर्विघ्नपणे) पार पाडील; शेतातल्या धान्याला शत्रूचा धक्का लागणार नाही आणि माता-भगिनींच्या हातची कंकणं (बांगड्या) अखंड किणकिणत रहातील, असल्या शांतितुष्टीपुष्टीयुक्त राज्याचे स्वप्न शिवरायांनी पाहिले. आपल्या आचरणाने प्रत्यक्षात आणले. आपण (बाबासाहेब पुरंदर यांनी) तो सारा चित्रपट आमच्या डोळ्यांपुढे उभा केलात. आमच्या गंजू पहाणार्‍या मनांना मानाने जगण्याचा अर्थ शिवचरित्रातून उलगडून दाखवलात.’

– दिवंगत लेखक पु.ल. देशपांडे (पु.ल. देशपांडे यांच्या लिखाणातील शब्द जसे तसे ठेवलेले आहेत. त्यात व्याकरणदृष्ट्या पालट केलेले नाहीत. – संकलक)

२. ‘शिवाजी राजा’ या प्रेरक शक्तीद्वारे लेखन करणारे बाबासाहेब !

‘राजा शिवछत्रपती’ या चित्रलेखनामागची स्वतःची भूमिका स्पष्ट करतांना बाबासाहेबांनी म्हटले, ‘शिवचरित्र हे कुणा एका व्यक्तीचे चरित्र नाही. ते चरित्र म्हणजे राष्ट्रधर्म आहे. समाजधर्म आहे. शत्रूशी कसे वागावे आणि स्वराज्यासाठी, सुराज्यासाठी मित्रांच्या जिवाला जीव कसा द्यावा ?  हे सांगणारे ते एक शास्त्र आहे. तत्त्वज्ञान आहे. विद्वत्ता गाजवण्यासाठी आणि शाली-मशालींचा मान मिळवण्यासाठी ही अक्षरे मी लिहिलेली नाहीत. मी हे शिवचरित्र एका सूत्रान्वये लिहिलेले आहे. ‘शिवाजी राजा-एक प्रेरक शक्ती’, हे ते सूत्र होय.’

– डॉ. चित्रलेखा पुरंदरे

३. भारतियांकडून इतिहासाचा सत्यानाश होत असल्याने बाबासाहेब विमनस्क झाले !

‘बाबासाहेबांचे अधूनमधून लंडनलाही येणे होत होते. एकदा असेच ते आले असतांना मी त्यांना घेऊन केंट भागातील ‘वेस्टरहॅम’ या शहरापासून काही अंतरावर असलेल्या ‘चार्टवेल’ या विस्टन चर्चिल यांच्या घरी गेलो होतो. चर्चिल यांचे ते खासगी घर ते रहात असतांना जसे होते, अगदी तसेच जतन करून ठेवले होते. अगदी त्यांच्या अर्धवट ओढलेल्या सिगारपर्यंत ! बाबासाहेब आणि त्यांचे थोरले चिरंजीव अमृतराव यांना मी संपूर्ण घर व्यवस्थित हिंडून प्रत्येक गोष्ट दाखवली. चर्चिल यांच्या नोबल पारितोषिकापासून ते त्यांच्या चित्रकलेच्या स्टुडिओपर्यंत प्रत्येक गोष्ट बाबासाहेब अत्यंत उत्कटपणे बघत होते. औत्सुक्याने न्याहाळत होते. जणूकाही त्यांचे चर्चिलचे अध्ययन चालू होते. ते घर बघून शेवटी आम्ही माझ्या घरी परत आलो. तिथून निघाल्यावर गाडीत बसल्यापासून बराच काळ ते एकही शब्द बोलत नव्हते. अगदी गप्प बसून होते. अश्विनीने विचारले, ‘‘बाबासाहेब, काही होते का ? तब्येत ठिक आहे ना ? काही औषध देऊ का ?’’ बाबासाहेब खिन्नपणे हसले. म्हणाले, ‘‘चर्चिलचे घर बघून आल्यावर मला आपल्याकडच्या भग्न आणि दुर्लक्षित ऐतिहासिक वस्तूंकडे बघून वाईट वाटलं. आम्ही काय अवस्था करून ठेवली आहे आमच्या भव्य इतिहासाची ? उलट इंग्रजांना बघा. किती जाणीवपूर्वक, अभिमानाने त्यांनी आपला इतिहास जपून ठेवला आहे. किती गर्वाने ते आपल्या इतिहासाचे संरक्षण करत आहेत. आम्ही कपाळकरंटे ! असलेल्या इतिहासाचा सत्यानाश करत आहोत.’’ असे म्हणून बाबासाहेब आपल्या खोलीत विमनस्कपणे निघून गेले. – श्री. अनिल नेने

(साभार: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी स्मृतिग्रंथ ‘सोनचाफा’)