विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको !

‘भारतीय चिकित्सापद्धत केंद्रीय आयोगा’ने ऐन प्रवेशाच्या कालावधीतच शासकीय आयुर्वेदाच्या महाविद्यालयांची पडताळणी करून यंदाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेवर बंदी घातली होती. त्यावर १ नोव्हेंबर या दिवशी आयोगाकडे सुनावणीही झाली; पण अद्यापही त्यावर कोणताच निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे संभाजीनगर येथील एका विद्यार्थिनीने स्वतःच्या ‘नीट’च्या परीक्षेचे निकालपत्र संकेतस्थळावरून वेगवेगळ्या दिवशी २ वेळा काढल्यानंतर २ प्रतींमधील गुणांमध्ये तफावत दिसून आली. पहिल्या निकालपत्रात ६५० हून अधिक गुण, तर दुसर्‍या निकालपत्रात २५० पेक्षाही अल्प गुण होते. असे होणे हे गंभीर, अनाकलनीय आणि संतापजनक आहे.

तिने परीक्षा घेणार्‍या संस्थेकडे पाठपुरावा केल्यानंतर काहीच प्रक्रिया न झाल्याने शेवटी न्यायालयात तक्रार प्रविष्ट केली. ‘विद्यार्थ्यांसाठी त्यांची शैक्षणिक कारकीर्द अमूल्य असते. विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि शैक्षणिक कारकीर्द यांच्याशी खेळणारे कोणते ‘रॅकेट’ आहे का ? याचा शोध संबंधित संस्था (एजन्सी) गांभीर्याने का घेत नाही ? तसेच प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर गंभीरपणे कारवाई करावी’, असा आदेश न्यायसंस्थेने दिला. मुळात असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? हा प्रश्न आहे. महाविद्यालय प्रशासन आणि विद्यापीठ प्रशासन यांनी स्वतःहून हा प्रश्न सोडवायला हवा. विद्यार्थ्यांचे गुण पालटतात, याचाच अर्थ कर्मचार्‍यांनी काहीतरी गडबड केली आहे. उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी स्पर्धा असते. एकेका गुणाने प्रवेश चुकतात. कुणाचाही दायित्वशून्यपणा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या मुळावर उठू शकतो. यावर न्यायालयाने नेमके बोट ठेवले आहे. त्यामुळेच न्यायालयाने संबंधित संस्थेला खडे बोल सुनावले.

न्यायालयाच्या आदेशाचा विचार केला, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याविषयी प्रशासनच उत्तरदायी आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा प्रश्नही सरकारने तातडीने सोडवला पाहिजे. महाविद्यालय आणि विद्यार्थी यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे; कारण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेळ ही गोष्ट अमूल्य आहे. निर्णयप्रक्रियेतील दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण करिअरवर परिणाम होऊ शकतो, तसेच त्यांचे मानसिक खच्चीकरणही होते. हे सर्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा चांगला राखणे आवश्यक आहे.

– श्री. सचिन कौलकर, मुंबई