पंजाबमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून लाखो शिखांचे धर्मांतर !

१४ वर्षांपूर्वी केवळ ३ सदस्य असलेल्या चर्चचे आज ३ लाख सदस्य !

चंडीगड (पंजाब) – ‘इंडिया टुडे’ नियतकालिकाकडून पंजाबमध्ये झपाट्याने होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतरावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पंजाब राज्यात ६५ सहस्र पाद्य्रांनी राज्यातील सर्व २३ जिल्ह्यांमध्ये लाखो शिखांचे धर्मांतर केले आहे. यामुळेच ‘अकाल तख्त’चे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी राज्यातील आम आदमी पक्षाच्या सरकारकडे केली आहे. ज्ञानी हरप्रीत सिंह म्हणाले की, ख्रिस्ती मिशनरी कथित चमत्कारांद्वारे उपचार करून बरे करण्याचे भासवत आहेत. या माध्यमातून शीख आणि हिंदू यांना फसवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा येत आहे. सरकारकडून मतपेटीचे राजकारण केले जात असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.’’

१. जालंधर जिल्ह्यातील खांबडा गावात बनलेल्या चर्चमध्ये सहस्रावधी लोक प्रार्थनेसाठी येतात. यामागे पाद्री अंकुर नरूला यांचा हात असून त्यांनी स्वत: वर्ष २००८ मध्ये धर्मांतर केले आहे. पुढे त्यंनी इतरांचे धर्मांतर करण्याचे दायित्व स्वीकारून ‘अंकुर नरूला मिनिस्ट्री’ची स्थापना केली. नंतर ‘चर्च ऑफ सायंस अँड वंडर्स’ही चालू केले. वर्ष २००८ मध्ये केवळ ३ सदस्य असलेल्या या चर्चचे आज ३ लाखांहून अधिक सदस्य आहेत; म्हणजेच गेल्या १४ वर्षांत ३ लाखांहून अधिक शीख आणि हिंदू यांचे धर्मांतर करण्यात आले आहे. ‘माझा’ आणि ‘दोआबा’ या परिसरांसह मालवातील फिरोजपूर, तसेच फाजिल्का येथील सीमावर्ती क्षेत्रांमध्ये ही संस्था अधिक सक्रीय आहे.

२. वर्ष २०११च्या जनगणनेनुसार पंजाब राज्यात ख्रिस्त्यांची एकूण लोकसंख्या ३ लाख ४८ सहस्र होती. आज एकट्या ‘नरूला मिनिस्ट्री’ची सदस्य संख्याच ३ लाखांहून अधिक आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या जाळ्यात फसल्यामुळे त्यांना ‘पगडीवाले ख्रिस्ती’ असे संबोधले जात आहे.

३. या वर्षाच्या आरंभी पंजाबात झालेल्या निवडणुकांमध्ये असा एक मोठा वर्ग होता, जो स्वत:ला दलित आणि ख्रिस्ती म्हणवून घेत होता. यातूनही धर्मांतराचे जाळे किती विस्तारले आहे, हे उघड होते.

४. ‘युनायटेड ख्रिश्‍चन फ्रंट’च्या आकड्यांनुसार पंजाबमधील १२ सहस्र गावांपैकी ८ सहस्र गावांत ख्रिस्त्यांनी समित्या स्थापन केल्या आहेत. अमृतसर आणि गुरदासपूर या दोन जिल्ह्यांत ६०० ते ७०० चर्च आहेत. यांतील ६०-७० टक्के चर्च गेल्या ५ वर्षांत उभारण्यात आले आहेत.

५. अशी स्थिती तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश यांसारख्या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये ८०-९० च्या दशकांमध्ये होती. यावरून पंजाब कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, हे स्पष्ट होते.

पंजाब राज्य बनले ख्रिस्त्यांच्या धर्मांतराची नवीन प्रयोगशाळा !

पवित्र सुवर्ण मंदिर असलेल्या अमृतसर येथील सेहंसरा कलां गाव ख्रिस्ती धर्मांतराचे मुख्य केंद्र आहे. गुरनाम सिंह नावाची व्यक्ती येथे पाद्री असून त्यांच्यामुळे असंख्य लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. गुरनाम सिंह हे पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.

मिशनर्‍यांमध्ये अमृत संधू, कंचन मित्तल, रमन हंस, गुरनाम सिंह खेडा, हरजीत सिंह, सुखपाल राणा, फारिस मसीह यांसारखी मोठी नावे आहेत. हे सर्व जण व्यवसायाने आधुनिक वैद्य, अभियंता, अधिवक्ता, पोलीस किंवा उद्योगपती आहेत. हे सर्व जण मूळ शीख असून ‘पगडीवाल्या ख्रिस्त्यां’ची संख्या वाढवण्यात यांचे मोठे योगदान आहे. यांच्या अनेक शाखा असून ‘यू ट्यूब’वर लाखो अनुयायी (फॉलोअर्स) आहेत.

कपूरथला जिल्ह्यातील खोजेवाल गावातील ‘ओपन डोर चर्च’ येथील पाद्री हरप्रीत देओल जाट हे शीख आहेत. बटाला येथील हरपुरा गावातील शल्यचिकित्सक (सर्जन) असलेले पाद्री गुरनाम सिंह खेडा हेसुद्धा जाट शीख आहेत.

पटियाला येथील बनूरच्या ‘चर्च ऑफ पीस’चे पाद्री मित्तल हे बनिया जातीचे आहेत, तर चमकौर साहिबचे पाद्री रमन हंस हेही शीख आहेत.

संपादकीय भूमिका 

  • आम आदमी पक्षाच्या सत्ताकाळात ख्रिस्ती मिशनर्‍यांना मोकळे रान मिळत असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांचा झालेला उद्रेक, हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्‍या हत्या, शीख आणि हिंदु यांचे होणारे धर्मांतर आदी घटना पहाता केंद्र सरकारने आता पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !
  • धर्मांतराच्या घटना रोखून ख्रिस्ती मिशनर्‍यांवर कारवाई होण्यासाठी केंद्र सरकारने आता तरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !
  • कथित शीखप्रेम असलेल्या खलिस्तानवाद्यांच्या साहाय्यानेच हे ख्रिस्ती मिशनरी स्वत:चे जाळे विणत नसतील कशावरून ? याचीही चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !