‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांचे प्रदर्शन थांबवण्याची अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी !

पुणे – ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांचे प्रदर्शन तातडीने थांबवावे. अन्यथा संपूर्ण राज्यात राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले जाईल, तसेच पुण्यातून जाणारे सर्व महामार्गही अडवले जातील, अशी चेतावणी अखिल भारतीय मराठा महासंघाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये मूळ इतिहासामध्ये पालट करून आधार नसलेली आक्षेपार्ह दृश्य आणि व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. इतिहासाची मोडतोड करून काल्पनिक पात्रे उभी केली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसमोर खोटा इतिहास मांडला जात आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातही मावळ्यांची वेशभूषा पालटून पात्रांची नावेही पालटली आहेत. त्यामुळे मनोरंजनाच्या नावाखाली इतिहासाची होणारी अपकीर्ती खपवून घेतली जाणार नाही, अशी चेतावणी महासंघाचे विधी सल्लागार अधिवक्ता समीर सहाणे यांनी दिली, तसेच या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष, इतिहास परिषदेचे राज्य अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. महासंघाच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.

१. ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करतांना ‘सेंसॉर बोर्डा’ने ऐतिहासिक व्यक्तीरेखेचे वंशज आणि मराठा सरदार यांच्या वंशजांकडून ना हरकत पत्र घेऊन चित्रपट मान्य करावा.

२. राज्य आणि केंद्र सरकारने चुकीच्या चित्रपटांमुळे समाजात पसरत असलेल्या चुकीच्या संदेशाची तातडीने नोंद घेऊन योग्य ती पावले उचलावीत.