सरकारने ही सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अशी शिवप्रेमींची मागणी आहे !
मुंबई, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या थडग्याजवळील अवैध बांधकाम १० नोव्हेंबर या दिवशी शासनाने पाडले; मात्र अशाच प्रकारचे अवैध बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी गडांवर विस्तारत आहे. यावर वेळीच कारवाई न झाल्यास भविष्यात अफझलखानाच्या थडग्याच्या भोवतालच्या अनधिकृत बांधकामांप्रमाणे हे प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. ही सर्व अवैध बांधकामे उघडपणे चालू असूनही, तसेच याविरोधात वेळोवेळी तक्रारी देऊनही पुरातत्व विभागाकडून यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. (तक्रारी करूनही निष्क्रीय रहाणार्या पुरातत्व विभागावर सरकारने कारवाई करावी ! – संपादक)
स्वराज्याचे आरमार उभारलेल्या दुर्गाडी गडावर ईदगाहच्या नावाखाली हिंदूंना प्रवेशबंदी !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली, त्या दुर्गाडी गडावरील श्री दुर्गाडी मंदिराच्या मागे असलेली भिंत ‘ईदगाह’ (ईदच्या दिवशी नमाजपठण करण्याची जागा) असल्याचा दावा स्थानिक मुसलमानांकडून करण्यात येत आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. वर्षातून २ वेळा येथे नमाजपठण केले जाते; मात्र यासाठी ही भिंत असलेल्या गडाच्या अर्ध्या भागात हिंदूंना कायमस्वरूपी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून येथे राज्य राखीव दलाचे ८ पोलीस २४ घंटे पहार्यासाठी ठेवण्यात आले आहेत. मुसलमान ज्या भिंतीला ईदगाह म्हणत आहेत, त्यावर ईदगाहप्रमाणे मनोरे नाहीत, तसेच मौलवीला उभे रहाण्यासाठी जागाही नाही. मागील ४८ वर्षे हा प्रश्न न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या दुर्लक्षामुळे लोहगडावर अवैधरित्या बांधला जात आहे दर्गा !
पुणे येथील लोहगडावर काही वर्षांपूर्वी अवैधरित्या थडगे बांधले. कोरोनाच्या काळात गडावर प्रवेशबंदी असतांनाही या थडग्याभोवती ५-६ फूट उंचीच्या पक्क्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांपासून येथे ‘हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्या’कडून अवैधरित्या उरूस साजरा केला जात आहे. १३ डिसेंबर २०१८ या दिवशी भारतीय पुरातत्व विभागाकडून मुंबईच्या पुरातत्व विभागाला ‘गडावर उरूस किंवा अन्य कोणताही धार्मिक विधी करू नये’, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. गडाच्या संरक्षणासाठी असलेल्या उत्तरदायी व्यक्तीने याविषयी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे तक्रार करूनही अद्याप या दर्ग्याचे बांधकाम पाडण्यात आलेले नाही.
मुंबईतील शिवडी गडाच्या प्रवेशद्वारावरील दर्ग्याचा अवैध विस्तार !
मुंबईतील शिवडी गडाच्या प्रवेशद्वारावर ‘दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह’ या नावाने दर्गा बांधला असून गडाच्या १ एकर भूमीत या दर्ग्याचा अवैधपणे विस्तार करण्यात आला आहे. दर्ग्याच्या देखभालीसाठी येथे एक मुसलमान कुटुंबही वसवण्यात आले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय म्हणून तेथे बकर्या पाळण्यात आल्या आहेत. दर्ग्याच्या भोवती हिरवे ध्वज लावले आहेत. त्यामुळे हा गड म्हणजे मुसलमानांचे धार्मिक स्थान असल्याप्रमाणे वाटत आहे. या सर्व अवैध प्रकारांकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत आहे. (राज्यातील हिंदुत्वनिष्ठ सरकारने याकडे लक्ष द्यावे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)
गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात !हिंदूंचे पवित्र श्रीक्षेत्र मलंगगड वक्फ मंडळाच्या नावे करण्याचा प्रयत्न !श्री मलंगगडावर नवनाथांपैकी सात नाथांच्या समाध्या आहेत, तसेच हे नाथपंथीय साधू मलंगबाबा यांचे समाधीस्थान आहे. वर्ष २००४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात सरकारने या भूमीला वक्फ मंडळाची भूमी असल्याचे घोषित केले आहे. याविरोधात येथील सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे येथील श्री. दिनेश देशमुख यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली असून सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे; मात्र मागील काही वर्षांपासून मुसलमान स्वत:ची वस्ती वाढवून मलंगगड बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. विशाळगडावर ६४ अतिक्रमणे !विशाळगडावर रेहानबाबाच्या नावाने दर्ग्याचे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक लोक नियमित दर्शनाला येत असल्याने तेथे मुसलमानांचे धार्मिक क्षेत्र निर्माण झाले आहे. पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असूनही या गडावर ६४ अतिक्रमणे झाली आहेत. विशेष म्हणजे येथील ग्रामपंचायतीने या अतिक्रमणाला अवैध ठरवले असून ही बांधकामे त्वरित हटवण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवले आहे. माहीम गडावरील राज्य पुरातत्व विभागाचे आधिपत्य केवळ नावाला !मुंबईतील माहीम गडावर पूर्णपणे अतिक्रमण करण्यात आले आहे. या गडाचे प्रवेशद्वार लोखंडी जाळीने बंद करण्यात आले असून प्रवेशद्वारापासूनच गडामध्ये अवैध वस्ती आहे. यामध्ये मुसलमानांची वस्ती मोठ्या प्रमाणात असून काही हिंदूंचीही घरे आहेत. या गडावरच अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर राज्य पुरातत्व विभागाचा फलक केवळ नावाला उरला आहे. कुलाबा दुर्गावर पुरातत्व विभागाच्या कार्यालयाच्या बाजूलाच अवैध मजार !कुलाबा दुर्गावर असलेल्या पुरातत्व विभागाच्या कार्यालयाच्या बाजूलाच २ वर्षांपूर्वी स्थानिक मुसलमानांनी अवैध मजार बांधली आहे. येथील शिवप्रेमींनी मागील वर्षी हे बांधकाम हटवले; परंतु पुन्हा तेथे पक्के बांधकाम करून मजार बांधण्यात आली आहे. पोलीस, प्रशासन, पुरातत्व विभाग आणि राजकीय नेते यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील गड-दुर्गांवरील अवैध बांधकामे वाढत आहेत. ज्याप्रमाणे अफझलखानाच्या कबरीजवळील अवैध बांधकाम हटवण्याची अभिनंदनीय कृती शासनाने केली, त्याप्रमाणे राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अवैध बांधकामे शासनाने त्वरित हटवावीत, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे. |