जळगाव जिल्ह्यातील रथोत्सव !

जळगाव येथील वैशिष्ट्यपूर्ण रथोत्सव !

विशिष्ट दिवशी देवतेच्या उत्सवमूर्तीस रथात विराजमान करून जी मिरवणूक काढली जाते, तिला ‘रथयात्रा’ वा ‘रथोत्सव’ म्हणतात. ‘रथ’ शब्दाचा दुसरा अर्थ ‘वीर’ वा ‘शूर’ असाही आहे. देवतांनी दैत्यांवर जे विजय मिळविले, त्याप्रित्यर्थ लोकांनी त्यांच्या गौरवार्थ आनंदोत्सवपूर्वक मिरवणूक काढल्याचे संदर्भ पुराणांत आढळतात. विजयी शूर-वीरांच्याही मिरवणुका रथांतून निघत असत. भविष्यपुराणात ब्रह्मदेवाच्या रथयात्रेची, तर देवीपुराणात दुर्गेच्या रथयात्रेची माहिती मिळते. वेदकाळी देवतांचे वाहन म्हणून रथास अनन्यसाधारण महत्त्व होते. रथ सिद्ध करणार्‍यांचा (रथकार) प्राचीन काळी एक स्वतंत्र वर्गच होता. ‘लोकांचे आरोग्य आणि सुख यांच्यासाठी मार्गशीर्ष शुक्ल पक्षात सूर्याची रथयात्रा करावी’, असे माद्रीच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’त म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यात आश्विन आणि मार्गशीर्ष मासामध्ये अनेक रथोत्सव पार पडतात. या रथोत्सवांना शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. ३८२ वर्षांची परंपरा लाभलेला पारोळा येथील बालाजी रथोत्सव आश्विन शुद्ध एकादशीला पार पडला. हा रथ ४१ फूट उंच असून त्याचे वजन दीड टन आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या शेंदुर्णी येथील रथाला २७८, पाचोरा येथील बालाजी रथोत्सवाला १८९, फैजपूर येथील रथाला १७४, तर जळगाव येथील श्रीराम रथोत्सवाला १४९ वर्षांची परंपरा लाभली आहे.

शेंदुर्णी, पाचोरा आणि फैजपूर येथील रथोत्सव कार्तिक शुक्ल चतुर्दशी, म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला ओढले जातात. सर्व रथांचे वैशिष्ट्य म्हणजे हे चंदन आणि साग या लाकडांपासून सिद्ध केलेले आहेत. रथाची चाके ही अखंड दगडापासून किंवा लाकडापासून बनवतात. संपूर्ण रथ हा झेंडू आणि शेवंती यांच्या फुलांनी सजवला जातो. रथोत्सव म्हणजे जणूकाही आनंदोत्सव असतो. रथोत्सवाचा हा दैदिप्यमान सोहळा पाहून भाविक भक्तीरसात डुंबून जातात. भक्त रथाला दोरखंडाच्या साहाय्याने ओढून मार्गक्रमण करतात; मात्र रथ थांबवण्यासाठी चाकांच्या खाली लाकडी मोगरी (चाकांची गती थांबवण्यासाठी बनवलेली लाकडी फळी) लावली जाते. हे जोखमीचे काम असून ही सेवा पारंपारिक पद्धतीने एका विशिष्ट कुटुंबाकडे दिली जाते. शतकानुशतके ही सेवा अव्याहतपणे (कोरोना महामारीचा कालावधी वगळता) चालू आहे हे विशेष ! रथांची शेकडो वर्षांची परंपरा हिंदु धर्माची महानता दर्शवते !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव