तारांकित हॉटेलसाठी सिडकोने दिलेला भूखंड त्याच उद्देशाने वापरला जाणार का ? याविषयी साशंकता !

नवी मुंबई – बेलापूर येथील सेक्टर २३ मधील एका तारांकित हॉटेलसाठी सिडकोने दिलेला भूखंड ई-निविदा आणि ई-लिलाव पद्धतीने त्यांनी विक्रीस काढला आहे. हा भूखंड खरेदी करून ‘भविष्यात भूखंडाच्या वापरात निवासी किंवा व्यावसायिक असा पालट केला जाऊ शकतो’, असे बांधकाम व्यावसायिकांना वाटत आहे. निवासी किंवा व्यावसायिक भूखंडाचे दर अधिक असल्यामुळे असे झाल्यास ‘सिडकोला हानी होऊ शकते’, अशी चर्चा आहे.

या भूखंडाचा दर सध्या प्रतिचौरस मीटर ८९ सहस्र ८१३ रुपये आहे. नियमानुसार भूखंडाच्या वापरात निवासी किंवा व्यावसायिक उपयोगासाठी पालट करायचा झाल्यास प्रतिचौ. मीटर साडेचार सहस्र रुपये बांधकाम व्यावसायिकांना द्यावे लागतात. त्यामुळे तो दर ९४ सहस्र ३१३ रुपये प्रतिचौरस मीटर होऊ शकेल आणि बांधकाम व्यावसायिकांना तो मिळू शकेल; मात्र सध्या या परिसरात भूखंडांचा दर प्रतिचौरस मीटर ३ लाखांहून अधिक आहे. त्यामुळेच नवी मुंबईत तारांकित हॉटेलसाठी सिडकोने काढलेला भूखंड हा त्याच प्रयोजनासाठी राखून ठेवावा, अशी मागणी होत आहे.

या तारांकित हॉटेल भूखंडाच्या निविदा पुस्तिकेत या भूखंडाच्या वापराच्या पालटास अनुमती दिली जाणार नसल्याचे सिडकोने नमूद केले आहे. तथापि भूखंडाच्या वापरात पालट करण्याचे धोरण सिडको संचालक मंडळाने यापूर्वी संमत केले आहे, तसेच भूखंड विक्री योजनांमध्ये मंत्रालयातून पालट करून घेतल्याची काही उदाहरणे पूर्वी घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भूखंडवापराच्या पालटास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी काही जण करत आहेत.