(म्हणे) ‘मतपेटीसाठी चाललेल्या राजकारणातून ‘मुसलमान त्रास देतात’, असा अपप्रचार केला जातो !’

  • ‘गुरुकुल विश्वपीठा’चे संस्थापक डॉ. अजयचंद्र भागवतगुरुजी यांची मुक्ताफळे

  • ‘जमाअत-ए-इस्लामी हिन्द कॅम्प’ यांच्या वतीने आयोजित ‘कोण आहेत प्रेषित मुहम्मद ?’ हे प्रदर्शन

पुणे – मुसलमान बांधवांमध्ये आल्यावर मला घरी आल्यासारखे आपल्या कुटुंबात आल्यासारखे वाटते. सामाजिक माध्यमांवर, दूरचित्रवाहिनीवर जे दाखवले जाते, त्यात आणि वास्तवात पुष्कळ तफावत आहे. मुसलमानबहुल परिसरात राहिलेल्या, तेथेच वाढलेल्या अनेक व्यक्तींना मी ओळखतो. त्यातील कोणत्याच व्यक्तीला एकाही मुसलमान व्यक्तीने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्रास दिलेला नसतो; मात्र मतपेटीसाठी चाललेल्या राजकारणातून ‘मुसलमान त्रास देतात’, असा अपप्रचार केला जातो, अशी मुक्ताफळे ‘गुरुकुल विश्वपीठा’चे संस्थापक डॉ. अजयचंद्र भागवतगुरुजी यांनी उधळली. (मुसलमानबहुल भागात देवतांच्या मिरवणुकीवर होणारी दगडफेक, सातत्याने होणारे हिंदु मुलींचे अपहरण, धर्मांतर आणि लैंगिक शोषण, काश्मिरी मुसलमानांनी काश्मिरी हिंदूंवर  केलेले भयानक अत्याचार, टीपू सुलतानने हिंदूंवर केलेले क्रूर अत्याचार यांविषयी अजयचंद्र गुरुजी काही बोलतील का ? धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती वेळोवेळी प्रसिद्धीमाध्यमांतून उघडपणे समोर येत असतांना अजयचंद्र गुरुजी कोणत्या जगात रहात आहेत ? – संपादक) येथील बालगंधर्व रंगमंदिर कलादालन, शिवाजीनगर येथे ५ नोव्हेंबर या दिवशी ‘जमाअत-ए-इस्लामी हिन्द कॅम्प’ यांच्या वतीने आयोजित ‘कोण आहेत प्रेषित मुहम्मद ?’ या इस्लामविषयक लिखाणाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

या वेळी ‘जीवन विद्या मिशन’चे संतोष तोतरे, बौद्ध संस्कृती अध्ययन केंद्राचे संचालक झेन मास्टर भन्ते सुदस्सन, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र नावडे, तसेच शेख इम्तियाज अली, शेख करीमुद्दीन आदी उपस्थित होते. मराठी भाषेत असलेले हे प्रदर्शन ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.