विधानसभेच्या अंधेरी (पूर्व) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी !

ऋतुजा लटके

मुंबई – विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या. त्यांना एकूण ६६ सहस्र ५३० इतकी मते मिळाली. या विरोधात भाजपने उमेदवार मागे घेतला, तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. अन्य ६ उमेदवारांपैकी एकालाही २ सहस्रांहून अधिक मते मिळवता आली नाहीत.

या वेळी प्रसिद्धीमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करतांना ऋतुजा लटके म्हणाल्या, ‘‘माझे पती रमेश लटके यांनी केलेली विकासकामे आणि जनसेवा यांमुळे मी विजयी झाले. रमेश लटके यांची अपूर्ण राहिलेली विकासकामे मी प्राधान्याने पूर्ण करीन. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांचे ११ मे २०२२ या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित झाली होती.’’

 अन्य उमेदवारांपेक्षा नोटाची मते अधिक !

या पोटनिवडणुकीत एकूण मतदान ८६ सहस्र ५७० इतके झाले. ऋतुजा लटके यांच्या व्यतिरिक्त अन्य ६ उमेदवारांपैकी राजेश त्रिपाठी यांना अधिकतम १ सहस्र ५७१ मते मिळाली, तर १२ सहस्र ८०६ मतदारांनी नोटाला (‘उभे असलेल्या उमेदवारांपैकी एकही पात्र नाही’, असे मानून उमेदवार नाकारणे) मत दिले. एकूण मतदारांच्या केवळ ३१.७४ टक्के एवढेच मतदान या पोटनिवडणुकीत झाले होते.