गोव्यात मुख्यमंत्री, अन्य मंत्रीगण यांसह भाविकांनी घेतले रथयात्रेचे भावपूर्ण दर्शन !
पणजी, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – अयोध्येतून चालू झालेल्या रामराज्य दिग्विजय रथयात्रेचे ५ नोव्हेंबर या दिवशी गोव्यात भव्य स्वागत झाले. विश्व हिंदु परिषद, गोमंतक यांच्या वतीने आयोजित ही रथयात्रा पत्रादेवी येथे पोचल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी श्रीरामाची पूजा केली. यानंतर रथयात्रा श्री बोडगेश्वर मंदिर, म्हापसा येथे आली. या ठिकाणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रथयात्रेचे स्वागत केले. प.पू. शक्ती शांतानंद महर्षी यांच्या नेतृत्वाखाली ही रथयात्रा काढण्यात आली आहे.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात रथयात्रेचा उद्देश सांगतांना प.पू. शक्ती शांतानंद महर्षी म्हणाले, ‘‘रामराज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे, देशाचे नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असे करणे, देशात शिक्षणात ‘रामायणा’चा समावेश करणे, कालगणना ‘ख्रिस्तपूर्व’ (ए.सी.) आणि ‘ख्रिस्तानंतर’ (डी.सी.) याऐवजी प्रभु श्रीरामाच्या पूर्वी अन् प्रभु श्रीरामाच्या नंतर अशी करावी, असे संकल्प करून या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.’’
याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘काश्मीरमधून ३७० कलम हटवणे, काशी विश्वनाथ कॉरिडोरची उभारणी, आदी धोरणे राबवून भारत देशाला विश्वगुरु बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न हे देशात रामराज आणण्यासाठीचेच प्रयत्न आहेत.’’ तत्पूर्वी विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी मोहन आमशेकर प्रास्ताविक करतांना म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद’ रूपी रावणापासून माता-बहिणींचे रक्षण करणे, तसेच भारतीय संस्कृती आणि मठमंदिरे यांचे रक्षण करणे, हे कार्य आपणास आता करायचे आहे.’’
रथयात्रा पणजी येथे पोचल्यानंतर तेथे मंत्री विश्वजीत राणे, मंत्री गोविंद गावडे आदींनी रथयात्रेचे स्वागत केले. म्हापसा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने, तर वास्को येथे सनातन संस्थेच्या वतीने रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. रथयात्रेने पुढे श्री राममंदिर मांगोर, वास्को; श्री हनुमान मंदिर, दवर्ली, मडगाव आणि नंतर पर्तगाळ मठ, काणकोण या मार्गाने मार्गक्रमण केले.