नेपाळला हवे हिंदु राष्ट्र !

नेपाळला तेथील राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला साम्यवादी नेते, माजी सैन्याधिकारी, नेपाळ सरकारमधील मंत्री आणि हिंदु धार्मिक संघटना यांचेही समर्थन आहे. नेपाळमध्ये ८१.३ टक्के हिंदू म्हणजे बहुसंख्य हिंदूच आहेत. नेपाळ जगाच्या पटलावर एकमेव हिंदु राष्ट्र अस्तित्वात होते; मात्र तेथील राजेशाहीविरुद्ध उठाव झाला आणि राजेशाही कोसळली. त्या समवेत हिंदु राष्ट्र म्हणून असलेली ओळख पुसली गेली. आता तेथे धर्मनिरपेक्ष लोकशाही असली, तरी ती साम्यवाद्यांच्या अखत्यारीतील आहे. तेथे साम्यवाद्यांचेच सरकार आहे. नेपाळ हिंदु राष्ट्र असतांना तेथील व्यवस्था, शासन पद्धत लोकांचे हित साधणारी होती. ‘नेपाळ हिंदु राष्ट्र असतांना आमची स्थिती चांगली होती. आता आमची स्थिती वाईट आहे. त्यामुळे नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवावे’, अशी इच्छा तेथील मुसलमान समाजाचीही आहे. यातून राजेशाहीवर आधारित हिंदु राष्ट्र हे नेपाळ आणि तेथील जनतेसाठी अनुकूल होते, त्यांचा विकास करणारे होते. तो लाभ त्यांना साम्यवाद्यांच्या प्रभावाखालील लोकशाहीतून मिळाला नाही.

केवळ विरोधासाठी विरोध आणि काही देशांचे अनुकरण करून वर्ष २००८ मध्ये धर्मनिरपेक्षता स्वीकारणार्‍या नेपाळमधील राजकीय पक्षांना आता त्यांची चूक लक्षात येत आहे. नेपाळमध्ये असलेल्या काही घटकांना राजेशाहीचे वावडे होते. त्यांना नेपाळच्या एकूण व्यवस्थेमध्ये स्थान मिळत नाही; म्हणून प्रचंड जनरेटा निर्माण करत राजेशाही उलथवली, तरी त्यांना स्वत:ला आणि देशाला त्याचा लाभ झालाच नाही. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वनिष्ठ सरकार अस्तित्वात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अनेक विकासकामे, मोठे प्रकल्प, नवीन योजना पूर्ण करत आहे. जगाच्या पटलावर भारताचा दबदबा वाढत आहे. उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ हे काही वर्षांपूर्वी नेपाळ येथे गेले असतांना त्यांनी तेथील एका कार्यक्रमात ‘नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करा’, अशी मागणी केली होती. लगोलग भाजपचे काही नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते यांनीही तशीच मागणी केली. भारतातील लोकप्रिय हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु जनजागृती समितीनेही नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी ‘ऑनलाईन’ मोहीम घेतली होती. या सर्वांचा दृश्य आणि अदृश्य परिणाम नेपाळी पक्ष अन् संघटना यांवर होत आहे. नेपाळहून अधिक हिंदू भारतात आहेत. ‘भारतालाच हिंदु राष्ट्र घोषित केल्यास नेपाळसह अन्य अनेक देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील’, असे पुरीचे शंकराचार्य यांनी म्हटले आहे. शासनकर्त्यांनी ते मनावर घ्यावे, ही हिंदूंची अपेक्षा !