चारचाकी गाडीला टेकून उभ्या असलेल्या ६ वर्षीय मुलाला सिशादने मारली लाथ !

मुलगा गंभीर घायाळ

कन्नूर (केरळ) – येथील थालास्सेरीमध्ये असलेल्या एका उद्यानाच्या परिसरात ३ नोव्हेंबर या दिवशी गणेश नावाचा ६ वर्षांचा लहान मुलगा एका चारचाकी गाडीला टेकून उभा होता. तेव्हा सिशाद नावाची व्यक्ती त्या गाडीतून उतरली आणि तिने मुलाच्या पाठीत जोरात लाथ मारली. यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी  सिशादला अटक केली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा गणेश हा मूळचा राजस्थान येथील असून तो त्याच्या वडिलांसमवेत मजुरीचे काम करण्यासाठी थालास्सेरी येथे आला आहे.

या घटनेवरून भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी ट्वीट करून केरळच्या पिनराई विजयन् सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, केरळ ही देवतांची भूमी (गॉड्स ओन कंट्री) राहिली नसून राक्षसांचे स्थान (डेविल्स ओन लँड) झाले आहे. बाल अधिकार संरक्षण आयोगानेही या घटनेची नोंद घेतली आहे.