विक्री थांबवण्याची मंदिर संस्थानचे विश्वस्त रामचंद्र गोसावी यांची मागणी
धाराशिव – खंडाने कसायला दिलेली रामदासी संप्रदायाच्या मठाच्या मालकीची ४०० एकर भूमी अवैध पद्धतीने परस्पर विकण्याचा प्रकार समोर आला आहे. या विक्रीतून ४०० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार झाला असून झालेले व्यवहार रहित करावेत, तसेच खंडाने कसण्यासाठी दिलेल्या भूमीची अवैधमार्गाने विक्री होत असून ती थांबवण्याची मागणी मंदिर संस्थानचे विश्वस्त रामचंद्र गोसावी यांनी जिल्हाधिकारी प्रशासनाकडे केली आहे.
१. धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथे रामदासी संप्रदायाचा ३०० वर्षे जुना मठ आहे. सातारा सज्जनगड येथील समर्थ रामदासस्वामींचे पट्टशिष्य कल्याणस्वामी हे होते. त्यांचे पट्टशिष्य जगनाथ स्वामी यांनी हा मठ कसबे तडवळा या ठिकाणी बांधून रामदासी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार यांचे काम केले आहे. या मठाची मूळ गादी सज्जनगड सातारा जिल्ह्यात आहे.
२. या मठाची १ सहस्र ७०० एकर भूमी धाराशिव तालुक्यातील सांजा, कावळेवाडी, दाऊतपूर आणि खामगाव या ४ गावांत आहे. मठाने भूमी याच गावातील काही लोकांना नाममात्र खंडाने कसण्यासाठी दिल्या होत्या; मात्र या लोकांनी श्रीराम मंदिर संस्थानची म्हणजे रामदासी संप्रदायची सांजा येथील १ सहस्र ४९९ एकर पैकी ४०० एकरहून अधिक भूमीवर ‘प्लॉट’ पाडून (भूमीचे विभाजन करून) विक्री केल्याचे समोर आले आहे. हे काम तहसीलदार तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांना हाताशी धरून करण्यात आल्याचा आरोप मंदिर संस्थानचे विश्वस्त रामचंद्र गोसावी यांनी केला आहे.
संपादकीय भूमिकासमाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! धार्मिक संस्थेच्या मालमत्तेमध्ये अपहारकेल्यास त्याचे पाप अनेक पटीने लागते, हे समजण्यासाठी धर्मशिक्षणच हवे ! |