कोकणात ८१० चक्रीवादळ निवारा केंद्रांना सरकारची संमती !

प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे काम रखडले !

मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – सातत्याने येणार्‍या चक्रीवादळांमध्ये मनुष्यहानी होऊ नये, यासाठी राज्य सरकारने वर्ष २०१८ मध्ये कोकणात चक्रीवादळ निवारा केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, ग्रामविकास, आपत्ती निवारण विभाग आदी विविध विभागांच्या समन्वयाने ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत; परंतु निधी उपलब्ध होऊनही प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे चक्रीवादळ निवारा केंद्रांचे काम रखडले आहे.

१. चक्रीवादळ निवारा केंद्रे उभारण्यासाठी समयमर्यादा ठेवण्यात आली नसल्याची माहिती एका अधिकार्‍याने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

२. जून २०१८ मध्ये याविषयी काढण्यात आलेल्या शासन आदेशात वर्ष २०१९-२० मध्ये या केंद्रांची कामे पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले होते; परंतु ३ वर्षे होत आली, तरी चक्रीवादळ निवारा केंद्रे कार्यरत झालेली नाहीत. याविषयी काम चालू असून ते कधीपर्यंत होईल, ते ठाऊक नाही.

३. चक्रीवादळ रोधक बांधकाम करणे, विद्युतवाहिन्या भूमीखाली टाकणे, नागरिकांना आपत्काळामध्ये वागण्याचे प्रशिक्षण देणे या सर्व कामांसाठी कोकण आपत्ती व्यवस्थापनामध्ये राज्यशासनाकडून २ सहस्र कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. यातूनच चक्रीवादळ निवारा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, समाजमंदिर आदी वास्तू चक्रीवादळ निवारा केंद्रे म्हणून वापरण्यात येणार आहेत.

४. ज्या ठिकाणी अशा वास्तू नाहीत, त्या ठिकाणी स्वतंत्र निवारा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये ३०० आणि ५०० व्यक्ती राहू शकतील इतक्या क्षमतेची ३ केंद्रे उभारण्यात येणार आहेत.