शाकाहार आणि सात्त्विकता !

१ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक शाकाहार दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘आहार मानवी शरिरासाठीच नव्हे, तर निसर्ग-पर्यावरणासाठी किती उपयुक्त आहे, तसेच शाकाहाराचे महत्त्व सर्वांना ठाऊक व्हावे, सर्वांनी शाकाहाराचा अंगीकार करावा’, हाच या दिवसाचा उद्देश आहे. शाकाहार म्हणजेच सात्त्विक, तर मांसाहार म्हणजे तामसिक आहार ! माणसाच्या शरिराची रचनाच मुळात ‘शाकाहार पचण्याच्या दृष्टीने सुलभ’, अशी आहे. त्याला छेद देत पचण्यास कठीण असलेला मांसाहार सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये प्रत्येक जण स्वतःपासून निरीक्षण करू शकतो आणि त्यावरून अंदाज बांधू शकतो.

सध्या मेजवान्या, वाढदिवस, उपाहारगृहात जेवण्यास गेल्यावर, सहलीतील भोजन आदी प्रसंगी मांसाहारालाच प्राधान्य असते. ज्यांना मांसाहार प्रिय आहे, त्यांना शाकाहारी जेवण जेवतांना कपाळावर आठ्या पडतात. अशा प्रकारे जेवण ग्रहण केल्याचा शरिराला लाभ होत नाही, असे आरोग्यशास्त्र सांगते. मन प्रसन्न ठेवून अन्न ग्रहण केले पाहिजे. जी मंडळी मांसाहाराचे अत्यंत आवडीने, पोटभर सेवन करतात. त्यांना शाकाहारी जेवण ग्रहण करतांना काही प्रसंगी मळमळल्यासारखे होते. यावरून लक्षात येते की, त्यांच्या शरिराला मांसाहाराची किती सवय लागली आहे ? आपण जो आहार घेतो, त्याप्रमाणे आपले विचार होतात. यासाठी आहार योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. शाकाहारी असल्याचा लाभच लाभ आहे. शरिरातील अवयवांना शाकाहारी अन्नाचे पचन करणे सोपे जाते.

पालकांनी मुलांना बालपणापासूनच शाकाहाराची सवय लावल्यास ते मुलांच्या आरोग्यासाठी हितकारक असेल. मांसाहाराची सवय आहे; पण तो सोडून शाकाहारी होण्याची प्रबळ इच्छा असल्यास त्यासाठी प्रयत्नपूर्वक, टप्प्याटप्प्याने शाकाहाराकडे वळले पाहिजे. यामुळे सात्त्विक विचार-आचार म्हणजे नेमके काय ? यांची अनुभूती घेता येईल. यात अशक्य असे काहीच नाही. केवळ मनाची सिद्धता महत्त्वाची आहे.

– श्री. जयेश राणे, मुंबई

________________________________

अधिक माहितीसाठी पहा ‘आहार विशेष स्मरणिका’ पुढील लिंकवर – https://sanatanprabhat.org/marathi/category/special-souvenir/diet