भोपाळमधील ‘हलालपूर’चे नाव पालटण्याचा प्रस्ताव संमत

नगरपालिकेच्या बैठकीला उपस्थित राहून साध्वी प्रज्ञासिंह यांची मागणी

साध्वी प्रज्ञासिंह

भोपाळ (मध्यप्रदेश) – भोपाळ नगरपालिकेच्या बैठकीत येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी उपस्थित राहून शहरातील लालघाटी आणि हलालपूर भागांची नावे पालटण्याची मागणी केली. त्यानंतर परीक्षणाच्या अटीच्या आधारे नगरपालिकेने हा प्रस्ताव संमत केला. या वेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी म्हटले की, ज्या ठिकाणी आदिवासींवर अत्याचार करण्यात आले, त्या ठिकाणांचीही नावे पालटायला हवीत.

१. नगरपालिकेच्या बैठकीमध्ये खासदारांना उपस्थित रहाण्यास अनुमती नसतांना साध्वी प्रज्ञासिंह तेथे पोचल्या होत्या. बैठकीत त्या उपस्थित नगरसेवकांना उद्देशून म्हणाल्या, ‘आम्ही इतिहास पालटू आणि नावेही पालटू.’ त्यांनी लालघाटी आणि हलालपूर ही नावे पालटण्याची मागणी केली. हलालपूरचे नाव ‘हनुमानगढी’,तर लालघाटीचे नाव ‘महेंद्रनारायण दास’  असे करण्याची मागणी केली.

२. विशेष म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह यांनी ज्या हलालपूरचे नाव पालटण्यास सांगितले, त्याचे यापूर्वीच ‘महंत नरहरिदास’ असे नाव ठेवण्यात आले आहे. काँग्रेसने म्हटले की, यावरून हे स्पष्ट होते की, शहराचे खासदार आणि महापौर यांना याविषयी काहीच ठाऊक नाही. अशा वेळी ते विकास कसे करणार ?