रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली आनंदवार्ता !
रामनाथी (गोवा) – अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असणारे, तसेच कर्नाटक सरकारचा ‘जकणाचार्य पुरस्कार’ प्राप्त करणारे कारवार येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी घोषित करण्यात आली. रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात सनातनच्या साधिका सौ. विद्या विनायक शानबाग यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश वाचून दाखवत ही आनंदवार्ता घोषित केली. सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते पू. नंदा आचारी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या भावसोहळ्याच्या आरंभी साधकांनी पू. नंदा आचारी यांनी घडवलेल्या श्री सिद्धिविनायक मूर्तीविषयी, तसेच तिचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती कथन केल्या. यानंतर पू. नंदा गुरुजी यांनी मूर्ती घडवतांना त्यांनी अनुभवलेला आनंद आणि भावावस्था यांविषयी संगितले. या वेळी पू. नंदा आचारी यांच्या धर्मपत्नी सौ. मंदा नंदा आचारी याही उपस्थित होत्या. या प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ याही उपस्थित होत्या.
पू. नंदा आचारी यांच्याविषयी उपस्थित साधकांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
या वेळी भावसोहळ्याला उपस्थित साधकांनी ‘पू. नंदा आचारी यांना ‘केवळ दगडाला स्पर्श करून त्यातून कुठली आणि किती उंचीची मूर्ती घडवली जाऊ शकते’, हे लक्षात येते. ते मूर्ती बनवतांना देहभान हरपून सेवा करतात. मूर्ती बनवतांना त्यांना आतून आनंद मिळत असल्याने त्यांना तहानभूक लागत नाही. त्यामुळे त्यांनी घडवलेल्या मूर्तीमध्ये पुष्कळ चैतन्य आणि सकारात्मकता असते’, अशी त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.
पू. बाबांनी मूर्ती कशी घडवायची, ते शिकवल्यामुळे मला त्यातील आनंद घेता येत आहे ! – गजानन नंदा आचारी (पू. नंदा आचारी यांचा मोठा मुलगा)
मी लहान असतांना बाबांनी (पू. नंदा आचारी यांनी) मूर्ती कशी घडवायची, हे मला शिकवले. त्यामुळे मलाही मूर्ती घडवतांना आनंद अनुभवता येत आहे. हे सर्व बाबांमुळेच शक्य झाले. सनातनच्या आश्रमात आल्यावर श्री सिद्धिविनायकाची मूर्ती बघून ‘ती आम्ही निर्माण केलेली नसून स्वयंभू आहे’, असे वाटून डोळे पाणावले (भावाश्रू आले). (श्री. गजानन नंदा आचारी हे सांगत असतांना त्यांचा भाव जागृत झाला होता. – संकलक)
जसे अमरशिल्पकार जकणाचार्य होते, तसे माझे सासरे आहेत ! – सौ. गायत्री गजानन आचारी (सून)
पूर्वीच्या काळी कर्नाटकातील प्रसिद्ध आणि ऋषितुल्य अमरशिल्पकार जकणाचार्य मूर्ती घडवत होते, तशाच मूर्ती आता माझे सासरे घडवत आहेत. सासर्यांना कर्नाटक सरकारने ‘जकणाचार्य पुरस्कार’ दिला आहे. त्यांनी घडवलेल्या मूर्तींमध्ये वेगळेपणाच जाणवतो. ते जसे मूर्ती घडवतात, तसेच त्यांनी कुटुंबालाही घडवले आहे. आता माझे पतीही तशाच प्रकारे मूर्ती बनवत आहेत आणि माझी २ मुलेही शाळेत जाण्यासह मूर्ती घडवण्यास शिकत आहेत. मुलांनाही मूर्ती बनवण्यात आवड निर्माण झाली आहे.
(या सोहळ्याचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)
पू. नंदा आचारी यांचे मनोगत
सर्व सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे शक्य झाले !
हे सर्व सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे शक्य झाले. जे काही घडत आहे, ते आधीच लिहून ठेवले असून मी केवळ निमित्तमात्र आहे.
आनंदी, उत्साही आणि तहान-भूक हरपून मूर्तीकलेशी एकरूप होणारे श्री सिद्धिविनायक मूर्तीचे शिल्पकार श्री. नंदा आचारी गुरुजी !‘कर्नाटक राज्यातील कारवारजवळ असलेल्या शिरवाड (जि. उत्तर कन्नड) येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी गुरुजी (वय ८२ वर्षे) यांनी आतापर्यंत देवतांच्या सहस्रो मूर्ती बनवल्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या पाषाणाला हात लावल्यावर ‘त्या पाषाणातून कोणती मूर्ती घडवता येईल ?’, हे जाणण्याचे आध्यात्मिक सामर्थ्य त्यांना प्राप्त आहे. सनातन संस्थेने वर्ष २०२० मध्ये आचारी गुरुजी यांच्याकडून ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाची मूर्ती घडवून घेतली. ही मूर्ती घडवत असतांना श्री गणपतीने गुरुजींना स्वप्नात अनेक वेळा दर्शन देऊन ‘मूर्तीत कोणते पालट करायचे ?’, याविषयी सांगितले. गुरुजींनी अथक परिश्रम घेऊन भावपूर्ण रीतीने ही सुंदर मूर्ती घडवली आहे. त्यामुळे या मूर्तीमध्ये शक्ती अन् चैतन्य यांचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. या मूर्तीचे दर्शन घेतांना साधकांना अनेक अनुभूती येतात आणि श्री गणपतीचे अस्तित्व जाणवते. मूर्ती घडवण्याचे कार्य चालू असतांना गुरुजींनी सनातनच्या रामनाथी आश्रमातील २ साधकांना स्वतःसमवेत ठेवून त्यांना मूर्तीकलेचे शिक्षण आणि आशीर्वादही दिले. गुरुजींच्या सहवासात या साधकांनी त्यांचा प्रेमभाव, देहभान हरपून सेवा करण्याची तळमळ, अहंशून्यता आणि देवावरील दृढ श्रद्धा अनुभवली. त्यांच्या सहवासात असतांना साधकांना ‘आपण संतांच्या समवेत आहोत’, असे वाटायचे. ज्या स्थानावर गुरुजी मूर्ती घडवण्याचे कार्य करतात, ते स्थानही आता अत्यंत पवित्र बनले असून ‘तेथे देवतांचा वास आहे’, अशी अनुभूती येते. गुरुजींमध्ये असलेल्या निष्काम भावाने, तद्रूप होऊन सेवा करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांनी घडवलेल्या देवतांच्या मूर्ती, ते स्थान आदी सर्व चैतन्यमय बनले आहे. देवावरील दृढ श्रद्धा आणि ध्यानी, मनी अन् स्वप्नी केवळ मूर्तीकलेचाच, म्हणजे भगवंताचाच ध्यास असल्याने गुरुजींची आध्यात्मिक उन्नती होत असून आजच्या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते संतपदावर विराजमान झाले आहेत. ‘श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने पू. नंदा आचारी गुरुजी यांची पुढील प्रगतीही जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’ – (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. आठवले (३.११.२०२२) |