|
नागपूर – वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस आणि त्यानंतर सॅफ्रन प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यांत गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ३१ ऑक्टोबर या दिवशी शहरातील धरमपेठ येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून फडणवीस यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनाच्या वेळी राष्ट्र्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कह्यात घेतले. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कागदाच्या प्रतिमांचे विमान हवेत उडवून राज्य सरकारचा निषेध केला. जळगाव शहर, हिंगोली, पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली, नाशिक येथेही राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ‘महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणार्या शिंदे-फडणवीस सरकारचा जाहीर निषेध’, असे फलक हातात घेत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.