मुंबई – ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची माहिती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना स्वत: तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती. ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचे या प्रकल्पाच्या प्रमुख्यांनी १ वर्षापूर्वीच उद्धव ठाकरे यांना सांगितले होते, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले,
१. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी विरोधी पक्षनेता असतांना टाटा एअरबस प्रकल्पाच्या प्रमुखांना प्रकल्पासाठी मी नागपूर येथील भूमी दाखवली. औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्यांसमवेत टाटा एअरबस प्रकल्पाच्या अधिकार्यांशी भेट घालून दिली. त्यानंतरही हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचे समजल्यावर मी प्रकल्पाच्या प्रमुखांना संपर्क केला. त्या वेळी राज्यातील वातावरण योग्य राहिले नसल्यामुळे गुजरातमध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले.
२. अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या काळात भ्रष्टाचार आणि वसुली करून गृहमंत्री कारागृहात गेले. नाणार येथे २५ सहस्र कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला आणि १ लाख इतकी रोजगारनिर्मिती होणार्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला केलेल्या विरोधामुळे महाराष्ट्राला सर्वाधिक तोटा झाला. याविषयी कुणीही पत्रकार लिहीत नाही. आमच्याविषयी काही पत्रकार चुकीची माहिती पसरवत आहेत.
३. महाराष्ट्रातील गुंतवणुकीवर बोलण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अधिकारच नाही. महाविकास आघाडीच्या काळात विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
४. येत्या वर्षात अर्थसंकल्पापूर्वी केंद्रशासन महाराष्ट्राला ‘टेक्सस्टाईल’ प्रकल्प देणार आहे. ‘मेडिकल डिव्हाईस पार्क’ आणि ‘बल्ग ड्रग्स् पार्क’ हे प्रकल्प महाराष्ट्राला देण्याची घोषणा केंद्र सरकारने कधीही केल नव्हती.
महाराष्ट्राला ‘इलेक्ट्रॉनिक्स’ उत्पादनांचे केंद्र बनवू !‘इलेक्ट्रॉनिक्स’ क्षेत्राला भवितव्य आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. केंद्रशासनाने महाराष्ट्रात २ सहस्र कोटी रुपयांचा इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प दिला आहे. पुणे येथील रांजणगाव येथे २९७.११ एकर जागेवर हा ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ प्रकल्प होणार आहे. यातून ५ सहस्र जणांना रोजगार उपलब्ध होतील. भविष्यात महाराष्ट्राला ‘इलेक्ट्रॉनिक्स’ उत्पादनाचे केंद्र बनवू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. |