कार्तिक वारीच्या काळात वारकर्‍यांना दर्शनासाठी सर्व त्या सुविधा देण्याचा प्रयत्न ! – बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर

दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्तिक वारी विशेष अभियान !

उजवीकडे बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर

पंढरपूर – कार्तिक वारीच्या काळात मंदिर २४ घंटे वारकर्‍यांना दर्शनासाठी चालू ठेवलेले आहे, तसेच रांगेत असणार्‍या वारकर्‍यांना अल्पाहार आणि चहा देण्याचे आमचे नियोजन आहे. सध्या मुखदर्शन आणि चरणदर्शन घेणार्‍या वारकर्‍यांची संख्या लाखाच्या आसपास आहे. प्रतिदिन २० रुपये देऊन भाविकांना प्रसादाचे लाडू उपलब्ध आहेत. १०० ‘सी.सी.टी.व्ही.’द्वारे आमचे गर्दीवर लक्ष असून कार्तिक वारीच्या काळात वारकर्‍यांना दर्शनासाठी सर्व त्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे व्यवस्थापक श्री. विठ्ठल पुदलवाड यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना दिली.

श्री. पुदलवाड पुढे म्हणाले, ‘‘मंदिर समितीच्या वतीने आलेल्या वारकर्‍यांमधील १४ प्रातिनिधिक वारकर्‍यांना ‘विशेष आरोग्य विमा’ देण्यात येणार आहे. यात २ लाख रुपयांचा रकमेचा समावेश आहे. कार्तिक वारीच्या दिवशी रात्री १२.४५ ते रात्री २ पर्यंत देवस्थानाची नित्यपूजा, यानंतर रात्री २ ते २.३० गाभारा स्वच्छता, रात्री २.३० पासून शासकीय महापूजेस प्रारंभ होतो. पहाटे ४ वाजता मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येतो. या प्रसंगी वारकर्‍यांमधील १ वारकरी दांपत्य आम्ही निवडतो, ज्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान केला जातो. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानाचे अनुमाने ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. यासह विनामूल्य सेवा देण्यासाठी वारीच्या काळात १ सहस्र २०० कर्मचारी कार्यरत असतात.’’

वारकर्‍यांच्या मागण्या

१. वारीच्या काळात देवस्थानाच्या वतीने नियमित देण्यात येणारा महाप्रसाद बंद करण्यात येतो. तो चालू करण्यात यावा; कारण बाहेरगावाहून अनेक वारकरी येतात त्यांची व्यवस्था होणे आवश्यक आहे.

२. मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी केवळ २ ठिकाणी सोय आहे, ती वाढवण्यात यावी, तसेच ‘वॉटर वेंडिग’ यंत्रे बसवण्यात यावीत.

३. येथे केवळ दोनच सुलभ शौचालये असून ती अत्यंत अपुरी पडत असल्याने वाढवण्यात यावी, तसेच महिला वारकर्‍यांसाठी विशेष शौचालये चालू करावीत.

४. पंढरपूर येथे शहर बससेवा नसल्याने, तसेच रिक्शांना मीटर नसल्याने रिक्शाचालक मनमानी पद्धतीने भाविकांकडून भाडे आकारतात. त्यावर वाहतूक पोलिसांनी अंकुश ठेवावा.