देशाला प्रगत आणि समृद्ध करणार्‍या गुरुकुल शिक्षणव्यवस्थेचे महत्त्व !

‘भारत देश पूर्वी पुष्कळ समृद्ध आणि प्रगत होता. त्याचे खरे कारण म्हणजे गुरुकुल शिक्षणव्यवस्था ! गुरुकुल शिक्षणव्यवस्थेद्वारे सक्षम पिढी निर्माण केली जात असे. ती पिढी देशाची धुरा यशस्वीपणे सांभाळू शकेल आणि देश अजून प्रगत अन् समृद्ध करू शकेल, अशा स्वरूपाची ती पिढी असायची. जेव्हा इंग्रज भारतात आले, तेव्हा त्यांनी ओळखले की, भारताची समृद्धी आणि प्रगती यांचे मूळ कारण येथील गुरुकुल शिक्षणव्यवस्था हीच आहे. जोपर्यंत आपण या व्यवस्थेला नष्ट करून तेथे भारतियांना गुलामगिरीची मानसिकता देईल, अशी आपली शिक्षणव्यवस्था निर्माण करत नाही, तोपर्यंत भारतावर सुखाने किंबहुना राज्यच करू शकणार नाही.

कु. जयेश कापशीकर

१. भारत स्वतंत्र झाला; मात्र शिक्षणात इंग्रजांचा गुलामच राहिला !

वर्ष १८३५ मध्ये भारतीय शिक्षणपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजांनी एक पथक बनवले होते. त्या पथकाचा मुख्य विल्यम ॲडम हा होता. तो उच्च स्तरावरील अधिकारी होता. त्याच्या हाताखाली काही अधिकारी काम करायचे, त्यातील एक मेकॉले होता. मेकॉले भारतातील शिक्षणपद्धतीच्या केलेल्या अभ्यासाचा अहवाल विल्यमला पाठवायचा. दोघांनी मिळून

१ सहस्र ७०० पानांचा अहवाल बनवला. तो इंग्रजांची ब्रिटनची संसद ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये सादर केला. त्यानंतर भारताची भव्यता तोडण्यासाठी मेकॉलेने गुरुकुल शिक्षणव्यवस्था संपवली आणि ब्रिटिशांची शिक्षणव्यवस्था चालू केली. तीच व्यवस्था आज भारतातील पुढील पिढीला गुलामगिरीची मानसिकता शिकवत आहे.

२. पाश्चात्त्यांचे अंधानुकरणकरण्यास शिकवणार्‍या मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम

जेव्हा एखादा देश स्वतंत्र होतो, तेव्हा तो त्याची नवीन व्यवस्था सिद्ध करतो. ती पूर्णपणे स्वतंत्र असते; पण भारताने स्वतंत्र झाल्यावर शिक्षणव्यवस्थाच काय, तर साधे कायदेही पालटले नाहीत. जोपर्यंत एखादी व्यक्ती कारागृहात असते, तोपर्यंत तिचे स्वतःचे असे काहीच नसते. कारागृहात जी शिक्षा दिली जाईल, ती निमूटपणे भोगली जाते; पण जेव्हा ती कारागृहातून सुटते, तेव्हा ती स्वतंत्र असते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा देश पारतंत्र्यात असतो, तेव्हा त्याचे स्वतःचे असे काही नसते; पण जेव्हा तो देश स्वतंत्र होतो, तेव्हा त्याचे सगळे स्वतःचे असलेच पाहिजे, अन्यथा त्या स्वतंत्र होण्याला काहीच अर्थ रहात नाही; पण आपण मात्र स्वतंत्र झाल्यानंतरही डोळे मिटून पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत आलो आहोत. आपण केवळ नावाने स्वतंत्र झालो; पण आपली मानसिकता गुलामगिरीचीच राहिली आहे. मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळेच हे होत आहे.

३. भारतातील सध्याची अपयशी शिक्षणपद्धत !

आपल्याकडे पूर्वी माणसाची योग्यता पदवीवरून नाही, तर त्याच्या ज्ञानावरून ओळखली जात होती. सध्याच्या काळात ज्ञानापेक्षा पदवी महत्त्वाची समजली आहे. भारद्वाजॠषि, सुश्रुतॠषि आदी ऋषींकडे कुठलीही पदवी नव्हती; पण ज्ञान होते; म्हणून त्यांनी सहस्रो वर्षांपूर्वी शोध लावलेले आहेत, हे जगाला आजही कळत आहे. इतके सारे सोडून आपण मात्र पाश्चात्त्यांकडेच वळत आहोत. आताच्या पिढीच्या घसरणीला ही गुलामी मानसिकतेची शिक्षणव्यवस्था कारणीभूत आहे. आताची भारताची शिक्षणव्यवस्था विद्यार्थ्यांचे मानसिक मनोबल वाढवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे, हे कोरोनाच्या संकटकाळात प्रकर्षाने जाणवले. त्यामुळेच सध्याची पिढी नैराश्यातून मृत्यूला कवटाळत आहे.

४. भारताला विश्वगुरु बनवण्याची भावना निर्माण करा !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत पालटली असती, तर आपल्या देशाची अशी दुःस्थिती झाली नसती. मोगल सत्ताधार्‍यांचा खोटा इतिहास शिकवल्यामुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. जर सत्य इतिहास शिकवला, तर मुलांमधील हिंदुत्वाची सुप्त भावना जागृत होईल. त्यांच्यातील हिंदुत्व पेटून उठेल. त्यांना समजेल की, भारत एकेकाळी विश्वगुरु होता; पण मनात एक प्रश्न येईल, ‘भारत याआधी विश्वगुरु होता ? मग आता का नाही होऊ शकत ?’ प्रत्येकाच्या मनात ही भावना जागृत झाली, तर भारताला पुन्हा विश्वगुरु होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही.’

– कु. जयेश कापशीकर (वय १६ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), पुणे. (५.७.२०२१)


मेकॉले याने ब्रिटनच्या संसदेमध्ये सादर केलेल्या अहवालात भारतीय शिक्षणव्यवस्थेचे केलेले वर्णन !

१. चांगल्या शिक्षणव्यवस्थेमुळे भारत वैभवसंपन्न !

‘मी आतापर्यंत संपूर्ण भारताची यात्रा केली. भारतात असे कुठले क्षेत्र नाही, जे मी बघितले नाही. मी जे सांगणार आहे, त्यावर तुमचा कुणाचाच विश्वास बसणार नाही; कारण मी भारतात एकही भिकारी बघितलेला नाही. असा कुणीही बघितला नाही, जो स्वतःच्या खाण्या-पिण्यासाठी दुसर्‍या समोर हात पसरतो. मी आतापर्यंत जगातील अनेक शहरांमध्ये फिरलो. एका बाजूला युरोपमधील शहरे आणि दुसर्‍या बाजूला सूरत शहर असे धरले, तर सूरतमधील संपत्ती अधिक भरेल. भारतावर राज्य करणे अवघड आहे; पण अशक्य नाही. जर भारतावर राज्य करायचे असेल, तर भारताची शिक्षणव्यवस्था मोडून टाकावी लागेल. भारतात जे काही वैभव आहे, ते केवळ त्याच्या शिक्षणव्यवस्थेमुळे आहे. भारतीय शिक्षणव्यवस्थेचे पहिले सत्य आहे की, येथे निरक्षरता नाही. जवळजवळ संपूर्ण भारत साक्षर आहे. इंग्लंडमध्ये केवळ १७ टक्के साक्षरता आहे.

२. भारतातील विश्वविद्यालये म्हणजे विविध विषयांवरील शिक्षण देणारी व्यवस्था !

भारतात जवळजवळ १५ सहस्र ८०० विश्वविद्यालये (हायर स्टडीज् सेंटर) आहेत. पूर्वी नालंदा आणि तक्षशिला ही विश्वविद्यालये होती. सर्व विश्वविद्यालये कुठल्यातरी एका विषयात निपुण आहेत, उदा. अमरावती विश्वविद्यालयात भूमीतून लोखंड, सोने आणि चांदी काढून ते वेगळे कसे करायचे, हे शिकवले जाते. कांगडा (हिमाचल प्रदेश) विश्वविद्यालय हे शस्त्रकर्मासाठी प्रसिद्ध आहे. तेथील एका आचार्याकडे न्यूनतम ५०० शस्त्रकर्मांची उपकरणे आहेत. हे आचार्य म्हणजे आताच्या एम्.एस्.च्या (मास्टर्स ऑफ सर्जरीच्या) तोडीचे आहेत.

३. ब्रिटनमध्ये केवळ बायबल शिकवले जाणे, तर भारतात १८ प्रकारचे विषय गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकवले जाणे

मेकॉलेने म्हटले होते की, भारतात ७ लाख गुरुकुले आहेत, तर इंग्लंडमध्ये केवळ ४० विद्यालयेच आहेत. तेथे कुणालाही गणित शिकवता येत नाही, तर केवळ बायबल शिकवले जाते. भारतातील गुरुकुलांमध्ये १८ विषय शिकवले जातात. सर्वाधिक प्राधान्य गणित विषयाला दिले जाते. त्यातही वैदिक गणित शिकवले जाते. त्यानंतर खगोलशास्त्र, धातूविज्ञान (मेटलर्जी), रसायनशास्त्र, चिकित्साशास्त्र इत्यादी विषयांना प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांना सर्व १८ विषय शिकवले जातात. मुलांना गुरुकुलात वयाच्या ५ व्या वर्षी प्रवेश मिळतो. जेव्हा त्यांचे शिक्षण पूर्ण होते, तेव्हा त्यांचे वय २१-२२ इतके असते.

वरील सर्व उदाहरणांतून लक्षात येते की, भारत किती समृद्ध देश होता आणि भारतातील गुरुकुल शिक्षणव्यवस्था किती उत्तम प्रतीची होती !’

– कु. जयेश कापशीकर

संपादकीय भुमिका

प्रत्येकाच्या मनात हिंदुत्वाची भावना जागृत झाल्यास भारत पुन्हा विश्वगुरु व्हायला वेळ लागणार नाही !