तरुण बंदीवान कशामुळे झाले ?

महाराष्ट्रातील तब्बल ६० कारागृहात ३८ सहस्र बंदीवानांपैकी जवळपास ५२ टक्के बंदीवान तरुण आहेत. देशातील उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. देशात शिक्षणक्षेत्रात प्रगत समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात तरुण बंदीवानांची इतकी संख्या असणे, ही लौकिकास कलंक लावणारीच आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत बाजीराव आणि माधवराव पेशवे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाज्वल्य इतिहास या भूमीशी निगडीत आहे. महाराष्ट्राची ओळख ‘संतांची भूमी’ अशी आहे. इतकी दैदिप्यमान आणि आदर्श ओळख धूसर होऊन एक निराळी ओळख निर्माण का होत आहे ? याचा सखोल विचार समाजाच्या सर्वच घटकांनी करणे आवश्यक आहे. १५ ते ४० वर्षे वयोगटातील तरुणांची इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी जगताकडे वाटचाल होत असेल, तर त्याचा ऊहापोह सर्वच स्तरांवर होऊन त्यामागची कारणे अभ्यासायला हवीत.

तरुणांचा वैचारिक पाया ढासळण्यामागे इंग्रजांनी भारतात रुजवलेली मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धत आहे. मेकॉलेप्रणित शिक्षणव्यवस्थेतून व्यक्ती खर्‍या अर्थाने घडत नाही, हे अनेक उदाहरणांतून सिद्ध होत आहे. नैतिक मूल्यांचे शिक्षण देऊन आदर्श व्यक्तीमत्व घडण्यात अल्प पडत आहे. विद्यार्थी स्पर्धा आणि तुलना यांच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अडकला आहे की, त्यातून तो विवेक गमावून बसला आहे. राष्ट्रप्रेम आणि धर्मशिक्षण हे विषय न शिकवल्यामुळे सिनेकलाकार आजच्या तरुणांचे आदर्श होत आहेत. चित्रपटांतून राष्ट्रासाठी त्याग करणे, प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करायची ? हे संस्कार न झाल्याने मुलांवर योग्य विचारांची पकड नाही. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण होत असल्यामुळे भौतिक सुखसुविधा मिळवण्याकडेच सर्वांचे लक्ष आहे. भ्रमणभाषचा अनावश्यक वापर, चारचाकी, उंची आस्थापनाचे कपडे, व्यसने, उंची राहणीमान हेच जीवन बनत चालले आहे. पती-पत्नी दोघांनीही नोकरी करणे, तसेच एकत्रित कुटुंबपद्धत लोप पावत चालल्याने लहानपणापासून मुलांवर होणारे संस्कार अल्प झालेले आहेत. एकूणच तरुणांची झालेली बिकट स्थिती सावरण्यासाठी त्यांना गुरुकुल शिक्षणपद्धतीचे शिक्षण देणे आणि त्यांच्यावर संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी तशी व्यवस्थाच सरकारने निर्माण करायला हवी.

– श्रीमती धनश्री देशपांडे, गोवा.