मुंबई येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अंनिसमधील दुफळी पुन्हा एकदा उघड !

अविनाश पाटील यांच्या गटाची पाठ !

मुंबई, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – नरिमन पॉईंट येथील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये ‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ यांच्या वतीने आयोजित दाभोलकर कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला स्वत: डॉ. दाभोलकर यांच्यासमवेत सतत कार्यरत असलेले अविनाश पाटील आणि त्यांचे समर्थक यांनी पात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉ. दाभोलकर कुटुंबीय आणि अविनाश पाटील या दोन्ही गटांतील दुफळी या कार्यक्रमातून पुन्हा एकदा दिसून आली. डॉ. दाभोलकर यांचे कुटुंबीय आणि अंनिसचे ठराविक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात कलाकृती सिद्ध केलेल्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांचीच बहुतांश उपस्थिती दिसत होती.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अभिनेते नसिरूद्दीन शाह, तसेच प्रमुख अतिथी म्हणून दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी शैला दाभोलकर आणि अधिवक्ता अभय नेवगी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार दीप्ती राऊत यांनी केली. पत्रकार अलका धुपकर यांनी शैला दाभोलकर यांच्याशी संवाद साधला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, डॉ. दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर, पत्रकार निखिल वागळे हेही उपस्थित होते. सकाळी ११ वाजता कार्यक्रमाची वेळ होती; मात्र उपस्थिती अल्प असल्यामुळे ४५ मिनिटे उशिराने कार्यक्रम चालू करण्यात आला. (यावरूनच अंनिसची लोकप्रियता किती आहे ? हेच यावरून दिसून येते. – संपादक)

दाभोलकर कला प्रदर्शनाच्या नावाखाली हिंदु धर्मावर टीका करणारी पुस्तके !

हिंदूंच्या धार्मिक विधींना अंधश्रद्धा ठरवण्याचा प्रयत्न !

प्रदर्शनाच्या ठिकाणी डॉ. दाभोलकर यांच्या कार्याची माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते. यामध्ये जन्मकुंडली, तसेच श्राद्धविधी आदी हिंदु धर्मातील विधी हे अंधश्रद्धा असल्याचे दाखवण्यात आले आहे.

कार्यक्रमात धर्म आणि हिंदुत्व विरोधी पुस्तकांची विक्री !

कार्यक्रमात लावण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात हिंदु धर्मावर टीका करणार्‍या पुस्तकांची संख्या अधिक होती. येथे ठेवण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्रासाठीचे तिसरे पाऊल’ या सुधीर पानसे लिखित पुस्तकामध्ये रा.स्व. संघाला ‘राज्यघटनाविरोधी’ दाखवण्यात आले आहे. तसेच आ.ह. साळुंखे यांची हिंदु परंपरांना अंधश्रद्धा ठरवणारी पुस्तके या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर आणि कारागृहात असलेले बुद्धीजीवी माझ्यासाठी प्रेरणादायी !’ – नसिरूद्दीन शाह, अभिनेते

केवळ डॉ. दाभोलकर नाहीत, तर कलबुर्गी, गौरी लंकेश यांसह अगणित अध्यापक, बुद्धीजीवी जे कारागृहात आहेत, ते माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. सत्य बोलणे, हा त्यांचा गुन्हा आहे. अंधश्रद्धा केवळ आपल्या देशात नाहीत, तर शेजारच्या राष्ट्रातही आहेत. मी ४-५ वर्षांचा असतांना एक मौलवी मला कुराण शिकवण्यासाठी यायचे. ‘भूमी चपटी आहे. सूर्य भूमीच्या भोवती फिरतो. मेल्यानंतर जन्नतमध्ये ७५ हुरा (सुंदर बायका) मिळतील’, असे मूर्खासारखे तो बोलायचा. कुराणाचा चुकीचा अनुवाद सांगणार्‍या मूर्ख मौलवीमध्ये जो आत्मविश्‍वास आहे, त्याप्रमाणे अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण होणे आवश्यक आहे.

कारागृहात असलेल्या बुद्धीजीवींवर नक्षलवाद्यांना साहाय्य केल्याचा आरोप आहे. अशांना नसिरूद्दीन शाह प्रेरणास्थान मानत असतील, तर शाह यांची चौकशी व्हायला हवी !

इस्लाममध्ये असलेल्या अंधश्रद्धा नसिरूद्दीन शाह यांना ठाऊक आहेत, तर त्या विरोधात ते आणि अंनिसवाले एकत्रित लढा का देत नाहीत ? केवळ हिंदूंच्या सण-उत्सव यांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या अंनिसवाल्यांचा हिंदुविरोधी मुखवटा उघड होतो !