श्री महालक्ष्मी मंदिरातील मुख्य शिखरावर प्रज्वलित करण्यात आला ‘काकडा’ !

शिखरावर काकडा प्रज्वलित करून झाल्यानंतर त्याच्या प्रकाशाने उजळलेले शिखर

कोल्हापूर – दीपावलीच्या पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरातील मुख्य शिखरावर पश्चिमेकडे सर्वांत उंचावर कापूर लावतात, त्यास ‘काकडा’ म्हणतात. हा ‘काकडा’ २४ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. आकाशासाठी म्हणजेच वायूसाठी पूर्वीच्या काळातील सर्वोच्च स्थान म्हणजे मंदिराचे शिखर, त्या ठिकाणी देवतेचा वास असतो. या भावनेतूनच काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा चालू झाली.

पहाटे २ वाजता मशालीच्या मंद उजेडात काकडा प्रज्वलित करतात. यानंतर हातात काकडा घेऊन मुख्य शिखराकडे पाठ करून वर चढणे आणि प्रज्वलित करून पुन्हा खाली उतरणे, ही सेवा श्री महालक्ष्मीदेवीवर श्रद्धा असलेल्या निस्सीम भक्तीमुळेच भाविक करू शकतात. त्रिपुरी पौर्णिमेला मंदिरातील दीपमाळा पालखी सोहळ्याच्या वेळी प्रज्वलित करतात.