‘अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ सोलापूर’च्या वतीने वसुबारसनिमित्त गोपूजन !

गोपूजन करतांना गोरक्षक आणि गोसेवक

सोलापूर, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘अखिल भारतीय कृषी गोसेवा संघा’च्या वतीने येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर वसुबारसच्या निमित्ताने गोपूजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी वेणुगोपाल जिल्ला पंतुलु, डॉ. उदय वैदय, मानद पशू कल्याण अधिकारी महेश भंडारी, तसेच चन्नवीर चिट्टे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर अतनुरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अक्षय अंजिखाने यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने गोरक्षक आणि गोसेवक उपस्थित होते.

या वेळी वेणुगोपाल पंतलु म्हणाले, ‘‘गोमातेची सेवा केल्याने सर्व गृहपीडा नष्ट होते. गायीचे दूध आणि गोमूत्र यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. गाय आणि वासरू यांच्या अंगी असलेली उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी ही आपल्याला सर्वांना लाभलेली एक अद्भुत देणगी आहे. त्यामुळे गोरक्षणाचे कार्य जोमाने करू.’’ या वेळी सौ. रजनी प्रमोद चिंचोरे यांच्या हस्ते गाय आणि वासरू यांचे औक्षण करण्यात आले.

१३ गायींचे प्राण वाचवून गोरक्षकांनी केली वसुबारस साजरा !

सोलापूर २६ ऑक्टोबर (वार्ता.) – धाराशिव येथे पशूवधगृहाकडे घेऊन जाणार्‍या १३ गोवंशियांची गोसेवकांच्या प्रयत्नांमुळे सुटका करण्यात आली. वाहनामध्ये गोवंशीय निर्दयीपणे चारही पाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत आढळले. या वेळी १ गाय मृत झाली. सर्वश्री कौस्तुभ सोमवंशी, सचिन जवळगे, कृष्णा सातपुते आदी गोरक्षकांनी पुढाकार घेत इंदापूर बावडा येथील पोलिसांच्या साहाय्याने गोवंशियांची सुटका केली. सर्व गायी श्री बोरमलनाथ गोशाळेत देण्यात आल्या आहेत, अशी माहिती श्री. प्रतीक भेगडे यांनी दिली.