संभाजीनगर येथील ‘अजित सीड्स’ आस्थापनातील ६ लाख रुपयांच्या बियाणे चोरीप्रकरणी निरीक्षकासह ३ जणांना अटक !

संभाजीनगर – येथील ‘अजित सीड्स’च्या फारोळा येथील प्लांटमधून २४ ऑक्टोबर या दिवशी अफरातफर करून आस्थापनातून ६ लाख रुपयांचे बियाणे चोरण्यात आले. या प्रकरणी बिडकीन पोलिसांनी ६ लाख रुपयांच्या बियाण्यांची चोरी करणार्‍या टोळीला कह्यात घेतले. यातील ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून बियाणे आणि ट्रक मिळून १५ लाख ८४ सहस्र ६१० रुपयांचा माल जप्त केला आहे. ‘या आस्थापनात काम करणारा सुपरवायझर दत्ता घोरपडे याने स्वतःच्या मित्रासमवेत ही अफरातफर केली आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली.

१. अजित सीड्स आस्थापनातील दप्तरातील नोंदीवरील माहिती आणि प्रत्यक्षात असलेल्या मालाची पहाणी केल्यानंतर या आस्थापनात ६ लाख रुपयांचा माल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

२. आस्थापनाने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आस्थापनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची विचारपूस केली, तसेच घटनास्थळावरून सीसीटीव्ही चित्रणाची पडताळणी केली.

३. १२ ऑक्टोबरच्या रात्री १ चारचाकी वाहन आस्थापनात आल्याविषयी दप्तरात नोंद केल्याचे दिसून आले नाही. या वाहनात ‘निरीक्षक दत्ता घोरपडे यांनी हमालांना वाहनात बियाणे भरण्यास सांगितले होते’, असे कर्मचार्‍यांनी पोलिसांना सांगितले.

४. पोलिसांनी घोरपडे याची चौकशी केली असता त्याने ‘हा माल त्याच गावातील मित्र अख्तर गफ्फार शेख याच्या साहाय्याने ट्रकचालक अझहर खमरोद्दीन काझी आणि आदील फईम काझी यांच्याशी संगनमत करून आस्थापनातील कर्मचारी आणि हमाल यांच्याकडून वाहनात भरून घेतला, तसेच कागदपत्रे सिद्ध करून आस्थापनाच्या बाहेर नेली आहेत’, असे सांगितले.

संपादकीय भूमिका

बियाण्यांची चोरी करणार्‍यांकडून पैसे वसूल करून घ्यावेत !