काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास नकार देणार्‍या तरुणाची ३ अल्पवयिनांकडून हत्या !

गोवंडी (मुंबई) – काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास बंदी करणारे सुनील नायडू (वय २१ वर्षे) यांची तीन अल्पवयीन मुलांनी हत्या केली. गोवंडी येथील शिवाजीनगर भागात २४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ही घटना घडली आहे.

१२ वर्षीय मुलाने काचेच्या बाटलीमध्ये फटाके फोडले. ‘काचा उडून त्या सर्वांना लागतील’, असे सुनील यांनी मुलाला सांगितले. याचा राग डोक्यात ठेवून या मुलाने त्याचा १५ वर्षीय भाऊ आणि १४ वर्षीय मित्र यांच्या साहाय्याने सुनील यांना मारहाण केली. १५ वर्षीय मुलाने सुनील यांच्या मानेत चाकू खुपसला. त्यानंतर सुनील तिघांच्या मागे पळत गेले; पण काही वेळाने ते जिन्यात कोसळले. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला असून दोन अल्पवयीन मुलांना कह्यात घेतले आहे, तर एकाचा शोध चालू आहे.

संपादकीय भूमिका 

संवेदनशीलता संपत चालल्याने मुलांमध्ये हिंसकता वाढत चालली आहे, हे दर्शवणारी घटना !