परिवहन विभागाच्या कारवाईत १ सहस्र १३७ खासगी ट्रॅव्हल्समधील अग्नीशमनयंत्रणा बंद असल्याचे आढळले !

मुंबई – उपप्रादेशिक परिवहन विभागाने (‘आर्.टी.ओ.’ने) ९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये १ सहस्र १३७ खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांतील अग्नीशमनयंत्रणा बंद असल्याचे आढळून आले. काही दिवसांपूर्वी नाशिक येथे खासगी ट्रॅव्हल्सला आग लागून ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्समध्ये अग्नीशमनयंत्रणा बंद असणे, हे गंभीर मानले जात आहे.

१. नाशिकमधील दुर्घटनेनंतर परिवहन विभागाने ही विशेष मोहीम राबवून राज्यातील ११ सहस्र ५११ खासगी प्रवासी बसगाड्यांची पडताळणी केली. यामध्ये २ सहस्र ९०२ बसगाड्यांनी वाहतुकीचे नियम पाळले नसल्याचे आढळून आले.

२. यामध्ये बसगाड्यांना ‘इंडिकेटर’, ‘वायपर’, ‘रिफ्लेक्टर’, ‘टेल लाईट’ बंद असणे, आपत्कालीन स्थितीत बाहेर पडायचे दरवाजे कार्यरत नसणे, पात्रता प्रमाणपत्र नसलेल्या चालकांनी वाहन चालवणे, मोटर वाहन कर न भरणे, अधिक भाडे आकारणे, अवैधरित्या मालवाहतूक करणे आदी गोष्टींचा समावेश आहे.

 

३. मोटर वाहन कर न भरलेल्या गाड्यांची संख्या सर्वाधिक २२५, तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणार्‍या गाड्यांची संख्या १०२ आहे.

४. अधिक भाडे आकारल्यामुळे कारवाई करण्यात आलेल्या गाड्यांची संख्या १७ इतकी आहे. नियमांची पायमल्ली करणार्‍या गाड्यांकडून एकूण ७१ लाख १६ सहस्र रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

दुर्घटना घडल्यावर सक्रीय झालेल्या परिवहन विभागाकडून नियमितपणे अशी कारवाई का होत नाही ? याची सरकारने चौकशी करावी !