सनातनचे आदर्श साधक !

‘समाजात प्रसार करतांना असे लक्षात येते की, अनेकांना ‘योग्य साधना म्हणजे काय ?’, हेच ठाऊक नसते. त्यातील काही जण साधना म्हणून जे काही करतात, ते सर्व स्वतःच्या मनाने करतात. साधनेमध्ये ‘स्वतःच्या मनाने साधना करणे’, ही साधनेतील पहिली आणि मोठी चूक आहे. ते ‘साधनेविषयी योग्य-अयोग्य काय आहे’, हे समजून घेण्याच्या स्थितीत नसतात. त्यामुळे त्यांच्याकडून ज्याला खर्‍या अर्थाने ‘साधना’ म्हणतात, ती चालू होत नाही; मात्र सनातन संस्थेत प्रत्येक साधकाला त्याच्या प्रकृतीनुसार साधना आणि सेवा सांगितली जाते अन् तो आज्ञापालन म्हणून ती मनापासून करत असतो. त्यामुळे त्याची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होत असते. याविषयी ‘सनातनचे साधक आदर्श कसे आहेत ?’, याविषयी भगवंताने मला पुढील विचार सुचवले.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. कलियुगातील या मायाबाजारी ईश्वराचे नाम घेणे, साधना करणे, हा टिंगलटवाळीचा विषय असतांना तन, मन आणि धन यांचा त्याग करून राष्ट्र अन् धर्म कार्य यांसाठी सर्वस्व झोकून देणारे सनातनचे निष्काम साधना करणारे साधक हे आदर्श आहेत.

२. कुटुंबीय, समाज, तसेच सर्वच स्तरांवर विरोध असतांना त्याला धैर्याने सामोरे जाणारे आणि केवळ गुरूंवर श्रद्धा ठेवून राष्ट्र अन् धर्म यांसाठी कार्य करणारे सनातनचे साधक आदर्श आहेत.

३. थंडी, ऊन, पाऊस यांचा विचार न करता, समष्टी साधना म्हणून प्रतिदिन आणि नित्यनेमाने समाजात जाऊन धर्मप्रसार करणारे सनातनचे साधक आदर्श आहेत.

४. साधनेविषयी मार्गदर्शन करत असतांना केवळ ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ असे केवळ तात्त्विक गोष्टींचा ऊहापोह न करता ते प्रत्येक तत्त्व आचरणात आणणारे सनातनचे साधक आदर्श आहेत.

५. ‘अनेकातून एकात येणे, स्थुलातून सूक्ष्मात जाणे, काळानुसार साधना, वर्णानुसार साधना, पातळीनुसार साधना’, या साधनेतील मूलभूत तत्त्वानुसार सनातनचे साधक त्यांना जी साधना सांगितली जाते, ती बुद्धीचा अडथळा न आणता श्रद्धापूर्वक करतात; म्हणून ते आदर्श आहेत.

६. अनेक संप्रदायांत तेथील उत्तरदायी साधक साधना करणार्‍यांना त्यांची चुका ऐकण्याची आणि स्वीकारण्याची स्थिती नसते; म्हणून त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगू शकत नाहीत. त्यामुळे ते अहंच्या टप्प्याला अडकून पडलेले असतात. त्या तुलनेत स्वतःच्या चुका इतरांना स्वतःहून सांगणारे, त्या चुका आश्रमातील फलकावर लिहिणारे, सत्संगात सांगणारे, त्या चुका प्रतिदिन स्वभावदोष निर्मूलन सारणीत लिहिणारे आणि त्या चुकांमागील स्वभावदोष घालवण्यासाठी अथक प्रयत्न करणारे अन् झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना करून प्रायश्चित्त घेणारे सनातनचे साधक आदर्शच होत.

७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रत्यक्ष भेट झालेली नसतांनाही केवळ त्यांचे शब्द, तेजस्वी विचार आणि त्यांच्यावरील श्रद्धा यांच्या बळावर व्यष्टी अन् समष्टी साधना करणारे सनातनचे साधक हे आदर्श होत.

८. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला स्थुलातून जसा विरोध आहे, तसा सूक्ष्मातून अनिष्ट शक्तींचाही प्रचंड विरोध आहे. या विरोधामुळे साधकांना अनेक प्रकारचे तीव्र शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास भोगावे लागतात; परंतु केवळ आपली साधना व्हावी अन् राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षासाठी हे त्रास सहन करून नेटाने आणि आनंदाने कार्य करणारे सनातनचे साधक हे सर्वार्थाने आदर्श होत !

९. ‘वारी वारी पडलो जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ।।’ (हे देवी, आम्हाला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडव. आम्ही तुला शरण आलो आहोत. आमच्यावरील हे संकट तूच दूर कर), अशा आरतीतील ओळी वर्षानुवर्षे न म्हणता त्यासाठी शक्य ते सर्व साधनेचे प्रयत्न अविरत करून याच जन्मात जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटणारे सनातनचे साधक आदर्शच होत.’

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सुचवलेली ही शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या पावन चरणी अर्पण !

इदं न मम ।’

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.८.२०२२)