धर्मशास्त्राने ग्रहणासंबंधी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे मानवाच्या हिताचे !

आज २५ ऑक्टोबर या दिवशी ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ आहे. त्या निमित्ताने…

संपूर्ण ग्रहणकाळात साधना करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘जेव्हा समष्टी पाप वाढते, तेव्हा पापाचारी आणि ‘वाढलेले समष्टी पाप नष्ट करण्यासाठी काहीही प्रयत्न न करणारे’ यांना दंड देण्यासाठी भूकंप, पूर, साथीचे रोग, दुष्काळ इत्यादी आपत्ती येतात. ही आपत्कालीन स्थिती अचानक उद्भवते. त्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी काही करायला वेळ मिळत नाही. याउलट साधना करून आधी माहिती असलेल्या ग्रहणासारख्या घटनांपासून होणार्‍या हानीपासून आपण स्वतःचे रक्षण करू शकतो. यासाठी संपूर्ण ग्रहणकाळात (वेध लागल्यापासून ते मोक्ष होईपर्यंत) साधना करणे आवश्यक आहे.’

 – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले    

‘ग्रहणकाळात धर्मशास्त्राने काही नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यामागील शास्त्र समजून न घेता सध्या बहुतेक लोक धर्मशास्त्राने सांगितलेल्या नियमांना बुरसटलेले विचार म्हणून त्यांची हेटाळणी करतात. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने वर्ष २०१७ पासून ‘ग्रहण’ संदर्भात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांतून सिद्ध झाले आहे की, ग्रहणाचा अन्नपदार्थ, वनस्पती, पशूपक्षी, मानव आदींवर आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक परिणाम होतात. ते विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने २१.६.२०२० या दिवशी झालेल्या सूर्यग्रहणाच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण संशोधन करण्यात आले. ते पुढे दिले आहे.

सौ. मधुरा कर्वे

१. ग्रहण

‘प्रत्येक ग्रह आपापल्या गतीने स्वतःच्या कक्षेतून (स्वतःभोवती फिरत फिरत) सूर्याभोवती फिरतो. सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी आल्यास तिची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्राचे तेज न्यून होते. याला ‘चंद्रग्रहण’, असे म्हणतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येऊन चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते, तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्यासारखे दिसते. सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले, तर ‘खग्रास सूर्यग्रहण’ आणि सूर्यबिंब अपूर्ण झाकले गेले, तर ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ होते. सूर्यबिंब कंकणाच्या (स्त्रियांच्या हातातील बांगडीच्या) आकारात झाकले गेले, तर दिसणार्‍या ग्रहणाला ‘कंकणाकृती ग्रहण’ म्हणतात. कंकणाकृती सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसत नाही; परंतु सूर्याबाहेरचा भाग बांगडीसारखा चमकतो. सूर्यग्रहण केवळ अमावास्येलाच होते.

२. ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम (वर्ष २०२० मध्ये झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणाविषयी)

‘ज्येष्ठ अमावास्या, रविवार, २१.६.२०२० या दिवशी भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडातील काही प्रदेश येथे सकाळी १० च्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे. हे सूर्यग्रहण दिवसाच्या दुसर्‍या प्रहरात (टीप) असल्याने शनिवारी २०.६.२०२० या दिवशी रात्री १० वाजल्यापासून ग्रहणमोक्षापर्यंत, म्हणजे २१.६.२०२० च्या दुपारी १.२८ पर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य आणि श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे; म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत; मात्र आवश्यक असे पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग आणि विश्रांती घेणे, ही कर्मे करता येतात. ग्रहणपर्व काळात (सकाळी १०.०१ ते दुपारी १.२८ या कालावधीत) मात्र पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग आणि झोपणे ही कर्मे निषिद्ध असल्याने करू नयेत. बालके, अशक्त आणि रुग्णाईत व्यक्ती, तसेच गर्भवती स्त्रिया यांनी २१.६.२०२० या दिवशी पहाटे ४.४५ पासून ग्रहणमोक्षापर्यंत (ग्रहण संपण्यापर्यंत) वेध पाळावेत.’ (साभार : दाते पंचांग)

टीप – एक प्रहर ३ घंट्यांचा असतो. दिवसाचे ४ आणि रात्रीचे ४ प्रहर मिळून एका दिवसात एकूण ८ प्रहर असतात.

३. चाचणीतील निरीक्षणांचे विवचन

सूर्यग्रहणाच्या दिवशी ग्रहणस्पर्श (ग्रहणाचा आरंभ), ग्रहणमध्य (ग्रहणाचा मध्य) आणि ग्रहणमोक्ष यांच्या वेळी आकाशात दिसणार्‍या सूर्यबिंबाची छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

 ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

३ अ. ग्रहणस्पर्शाच्या छायाचित्रामध्ये सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा, तर ग्रहणमोक्षाच्या छायाचित्रामध्ये सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असणे

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. ग्रहणस्पर्शाच्या छायाचित्रामध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून सर्वाधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आहे.

२. ग्रहणस्पर्शाच्या तुलनेत ग्रहणमध्याच्या छायाचित्रामध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण थोडे उणावले आहे. या छायाचित्रामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे.

३. ग्रहणमोक्षाच्या छायाचित्रात नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आहे.

४. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

४ अ. ग्रहणस्पर्शाच्या छायाचित्रातून वातावरणात सर्वाधिक प्रमाणात त्रासदायक (नकारात्मक) स्पंदने प्रक्षेपित होणे : ग्रहणकाळात सूर्यबिंब जेवढा वेळ जितक्या प्रमाणात झाकले जाते, तेवढा वेळ सूर्याकडून येणारा तेजोमय प्रकाश अडवला जातो. यामुळे अनिष्ट शक्तींना वातावरण पोषक बनल्याने त्या सक्रीय होतात आणि ग्रहणकाळात अधिकाधिक साधना करून त्रासदायक शक्ती मिळवतात. त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक (नकारात्मक) स्पंदनांमुळे वातावरण दूषित होते. ग्रहणस्पर्शाच्या छायाचित्रामध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अधिक असल्याने त्यातून वातावरणात त्रासदायक (नकारात्मक) स्पंदने प्रक्षेपित झाली.

सूर्यबिंबाचे ग्रहणस्पर्शाचे छायाचित्र

४ आ. ग्रहणस्पर्शाच्या तुलनेत ग्रहणमध्याच्या छायाचित्रातील नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण थोडे न्यून होणे : ग्रहणमध्याच्या वेळी सूर्यबिंबाला लागलेले ग्रहण सुटण्याची प्रक्रिया आरंभ होते. त्यामुळे सूर्याचे तेज हळूहळू वाढू लागते आणि वातावरणातील नकारात्मक स्पंदने हळूहळू नष्ट होऊ लागतात. यामुळे ग्रहणस्पर्शाच्या तुलनेत ग्रहणमध्याच्या छायाचित्रात नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण थोडे न्यून झाल्याचे दिसून आले.

४ इ. ग्रहणमोक्षाच्या छायाचित्रातून वातावरणात सर्वाधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : जसजसा ग्रहणमोक्षाचा काळ जवळ येतो, तसतसे सूर्याकडून येणार्‍या तेजोमय प्रकाशाने वातावरण उजळू लागते. ग्रहणमोक्ष झाल्यानंतर अनिष्ट शक्तींना वातावरण अनुकूल न राहिल्याने त्यांचा वातावरणातील संचार संपुष्टात येतो. सूर्याच्या प्रखर तेजामुळे वातावरणात निर्माण झालेली नकारात्मक स्पंदने नष्ट होऊ लागतात आणि वातावरण हळूहळू पूर्ववत् होते. यामुळे ग्रहणमोक्षाच्या छायाचित्रात सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली.

सूर्यबिंबाचे ग्रहणमोक्षाचे छायाचित्र

५. धर्मशास्त्राने ग्रहणकाळात नियम पाळावयास, तसेच साधना करण्यास सांगितलेले असणे

ग्रहणकाळात वातावरणात वाढलेले रज-तम आणि त्रासदायक शक्ती यांपासून होणार्‍या हानीपासून स्वतःला वाचवण्याचा सर्वाेत्तम उपाय म्हणजे ‘साधना करणे’. साधनेमुळे त्यांचा परिणाम अल्प किंवा नष्ट होतो, तसेच ग्रहणकाळात केलेल्या साधनेचा नेहमीच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक लाभ मिळतो. यामुळे धर्मशास्त्राने ग्रहणकाळात काही नियम पाळावयास सांगितले आहेत, तसेच सामान्य लोकांसाठी देवपूजादी सात्त्विकता वाढवणार्‍या कृती (साधना) करण्यास सांगितले आहे. ग्रहणपर्वकाळ हा ‘पुण्यकाल’ असल्याने या काळात ईश्वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतात. ग्रहणकाळात वायूमंडलात रोगजंतू, तसेच अनिष्ट शक्ती यांचा प्रभावही वाढलेला असतो. त्या काळात पाणी पिणे, मल-मूत्रत्याग करणे, झोपणे यांसारखी कोणतीही रज-तमगुणी कृती केली, तर त्या माध्यमातून अनिष्ट शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो. याउलट ग्रहणकाळात नामजप, स्तोत्रपठण यांसारखी कृती, म्हणजे साधना केली, तर स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण होऊन ग्रहणाच्या अमंगल प्रभावापासून स्वतःचे रक्षण होते.’

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.६.२०२०)

ई-मेल : [email protected]