पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये साजरी केली दिवाळी !

दिवाळी म्हणजे आतंकवाद संपवण्याचा उत्सव ! – पंतप्रधान मोदी  

कारगिल (लडाख) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी लडाखमधील कारगिल येथे जाऊन भारतीय सैन्याच्या सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रतिवर्षी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करतात. वर्ष २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा सियाचीनमध्ये सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली होती. दिवाळीला मोदी सैनिकांमध्ये पोचण्याचे हे ९ वे वर्ष आहे.

पंतप्रधान मोदी सैनिकांना म्हणाले की, दिवाळी म्हणजे आतंकवाद संपवण्याचा उत्सव. कारगिलनेही तेच केले. कारगिलमध्ये आपल्या सेनेने आतंकवादाची नांगी ठेचली आणि देशात विजयाची अशी दिवाळी साजरी झाली होती की, जी आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्या विजयाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आणि मी ते युद्ध जवळून पाहिले. २३ वर्षे जुनी छायाचित्रे दाखवून त्या क्षणाची आठवण करून दिल्याने मी येथील अधिकार्‍यांचा आभारी आहे. देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून माझे कर्तव्य मला रणांगणात घेऊन आले होते. आम्हाला जे काही साहाय्य करता येईल, ते करण्यासाठी आम्ही येथे होतो.