बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

बलीप्रतिपदा

१. तिथी

कार्तिक शुक्ल प्रतिपदा

 २. महत्त्व

हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.

३. इतिहास

अ. ‘अश्वमेध यज्ञ केलेला बळीराजा मोक्षार्थी आहे’, हे जाणून विष्णु वामनरूप धारण करून यज्ञात ‘याचक’ म्हणून आला. इंद्रपदाच्या अधिकार भोगासाठी दीन झालेल्या वडील (मोठा) भाऊ इंद्राला जगताचा एक तुकडा द्यावा; म्हणून बटु वामनाने बाह्यतः फसवून; पण आंतरिकदृष्ट्या बळी चक्रवर्तीचे कोटकल्याण करून दोन पावलांनी पृथ्वी आणि स्वर्ग लोक व्यापून तिसर्‍या पावलाने बळीला पाताळात लोटले.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

४. सण साजरा करण्याची पद्धत

अ. बलीप्रतिपदेच्या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात.
आ. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा आणि फुले खोचतात. कृष्ण, इंद्र, गायी आणि वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात अन् मिरवणूक काढतात.
इ. ‘बलीराज्यात शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून आपल्या मनाला वाटेल, तसे लोकांनी वागावे’, असे धर्मशास्त्र सांगते. अभक्ष्यभक्षण, अपेयपान आणि अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवतात (आतषबाजी करतात); पण दारू पीत नाहीत ! शास्त्राने अनुमती दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात.

या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. ओवाळल्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व प्रकट होते.


बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा) : संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – 

https://sanatanprabhat.org/marathi/620805.html

_____________________