महाराष्ट्रात अभियांत्रिकीचा पदवी अभ्यासक्रम मराठी भाषेत शिकता येणार !

  • उच्चशिक्षण विभागाचा स्तुत्य निर्णय !

  • फार्मसी आणि एम्.बी.ए. पदवी अभ्यासक्रमांचाही समावेश !

  • अभ्यासक्रमांचे भाषांतर करण्याच्या उच्चशिक्षण विभागाच्या सूचना !

नागपूर – अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग), ‘फार्मसी’ आणि ‘एम्.बी.ए.’ या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण आता मराठी भाषेतून घेता येणार आहे. या तिन्ही अभ्यासक्रमांचे इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतर करण्याच्या सूचना उच्चशिक्षण विभागाने विद्यापिठांना दिल्या आहेत. नागपूर, अमरावती आणि गडचिरोली या ३ विद्यापिठांकडे हे अभ्यासक्रम मराठीत भाषांतरित करण्याचे दायित्व सोपवण्यात आले आहे. हे भाषांतर कशाप्रकारे करण्यात येईल, याचा आराखडा २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करावा, अशा सूचनाही उच्चशिक्षण विभागाने विद्यापिठांना दिल्या आहेत.

शैक्षणिक धोरणात मातृभाषेचा आग्रह !

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणावर भर देण्यात आला आहे. धोरणात ‘उच्चशिक्षणही मातृभाषेतच द्यावे’, अशी सूचना करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण हिंदीमध्ये चालू करण्याचे घोषित करण्यात आले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रातही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.

नागपूर येथे उच्चशिक्षण विभागाची बैठक !

नागपूर येथे २१ ऑक्टोबर या दिवशी उच्चशिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि विद्यापिठांची प्रगती’ या विषयावर आयोजित केलेल्या या बैठकीत उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संचालक धनराज माने, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ यांचे कुलगुरु उपस्थित होते.