रशिया झाला भारताचा ७ वा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार
नवी देहली – भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारामध्ये एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या ५ मासांच्या कालावधीत विक्रमी वाढ झाली. उभय देशांमध्ये तब्बल ५०० टक्क्यांनी झालेल्या व्यापार वृद्धीमुळे रशिया आता भारताचा ७ वा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार झाला आहे. रशिया-युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे पश्चिमी शक्तींनी रशियावर मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले असतांना भारताचे मात्र रशियाशी व्यापारी संबंध वृद्धींगत झाल्याने याकडे विशेषत्वाने पाहिले जात आहे.
१. वाणिज्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, उभय देशांमध्ये एप्रिल ते ऑगस्ट या ५ मासांच्या कालावधीत १८ सहस्र २२९ दशलक्ष डॉलरचा व्यापार झाला. याआधी वर्ष २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये हा आकडा केवळ १३ सहस्र १२४ दशलक्ष डॉलर होता. वर्ष २०२०-२१ मध्ये ८ सहस्र १४१ डॉलर, वर्ष २०१९-२० मध्ये १० सहस्र ११० दशलक्ष डॉलर, तर वर्ष २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये भारत-रशिया यांच्यामध्ये ८ सहस्र २२९ दशलक्ष डॉलर मूल्याचा व्यापार झाला.
२. या ५ मासांत झालेल्या व्यापारामध्ये तब्बल ९५ टक्के आयात करण्यात आली, तर ५ टक्के गोष्टींची भारताने रशियाला निर्यात केली. आयातीपैकीही ८४ टक्के आयात ही इंधन, तेल, त्यांच्यापासून बनलेली उत्पादने आदी गोष्टींची करण्यात आली.
३. एकूणच भारताशी सर्वाधिक व्यापार करणार्या देशांमध्ये अमेरिका, चीन, संयुक्त अरब अमिराती, साऊदी अरेबिया, इराक आणि इंडोनेशिया यांच्यानंतर आता रशियाचा क्रमांक लागतो.
४. रशियाशी अधिकाधिक वाढत असलेल्या व्यापारी संबंधांमुळे भारतावर वेळोवेळी टीका करण्यात आली. त्यावर केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी विविध व्यासपिठांवर जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भारतावर आरोप करणार्या युरोपीय देशांनी हे लक्षात ठेवावे की, आजही रशियाचे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आयात करण्यात युरोपीय देशच आघाडीवर आहेत.