प्रेमळ, वैद्यकीय सेवा करण्याचे ध्येय असणारी आणि लहान वयातच मायेपासून अलिप्त राहून साधनेचा दृढ निर्धार करून साधना करणारी कु. वैदेही राजेंद्र शिंदे !

कु. वैदेही राजेंद्र शिंदे हिच्याविषयीच्या या लिखाणातून दैवी बालके जन्मतःच कशी सात्त्विकतेची आणि देवाची ओढ असणारी असतात ?’, ते लक्षात येते. या बालकांवर लहानपणापासून साधनेचे संस्कार झाले, तर त्यांच्याकडून साधना घडून त्यांच्या मनुष्यजन्माचे सार्थक होते. सद्गुरु राजेंद्रदादा हे स्वतः आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आहेत आणि आई सौ. मीनलताई याही सात्त्विक आहेत. त्यामुळे वैदेहीतील साधकत्व अंकुरले असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छत्रछायेखाली ते बहरत आहे. वैदेहीचे वडील सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. देवाची ओढ

‘कु. वैदेही लहान असतांना तिच्या आजीच्या समवेत आवडीने देवळात जायची. देवळात जातांना एका वळणावर छोटेसे शिवाचे मंदिर आहे. देवळात जातांना कुणालाही ते सहज दिसत नाही; परंतु वैदेही न विसरता तेथे वळून त्याचे दर्शन घेऊनच पुढे जायची.

२. सहनशील

वैदेही लहानपणी पुष्कळ रुग्णाईत होती. तेव्हा काही वेळा तिला ‘इंजेक्शन’ घ्यावे लागायचे. अधूनमधून कधी तिची रक्त पडताळणीही करावी लागायची. त्या वेळी ती अतिशय स्थिर राहून हे सर्व करून घ्यायची. ती कधी ‘इंजेक्शन’ला घाबरली किंवा रडली नाही.

कु. वैदेही राजेंद्र शिंदे

३. बालपणापासून सूक्ष्मातील जाणीव असणारी वैदेही !

अ. ‘वैदेही साधारण दुसर्‍या किंवा तिसर्‍या इयत्तेत शिकत असतांना आम्ही सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांनी वैदेहीला काही नक्षी दाखवल्या आणि विचारले, ‘‘कोणत्या नक्षीकडे पाहून चांगले वाटते आणि कोणत्या नक्षीकडे पाहून त्रासदायक वाटते ?’’ त्याची तिने योग्य उत्तरे दिली.

आ. काही वेळा मी चादरीखाली काही वस्तू ठेवून तिला ‘‘कशाकडे बघून चांगले वाटते आणि कुठे बघून चांगले वाटत नाही ?’’, असे विचारत असे. तेव्हाही ती ते बरोबर सांगत असे.

इ. वर्ष २०२१ मध्ये ती रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी वास्तव्यास असतांना मी तिला काही साधकांची नावे दूरभाषवरून सांगितली. त्या साधकांमध्ये ‘भाव, तळमळ, अभ्यास इत्यादींचे प्रमाण किती टक्के आहे ?’, असे विचारले. तेही तिने बरोबर सांगितले होते.

४. महाविद्यालयाच्या मायेत न अडकता साधनेकडे लक्ष देणे

तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने वैद्यकीय महाविद्यालयात ‘फिजियोथेरेपी’साठी प्रवेश घेतला. तिचे महाविद्यालय घरापासून दूर नवी मुंबई येथे होते. तिला महाविद्यालयात पोचायला साधारण एक घंटा लागायचा. त्या वेळी रेल्वेने जातांना ती प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन किंवा माझ्या आवाजातील प्रार्थना ऐकायची. महाविद्यालयात असतांना ती मित्र-मैत्रिणींमध्ये न रुळता साधनेकडेच लक्ष द्यायची.

५. कु. वैदेहीचे देवद आश्रमातील वास्तव्य !

५ अ. कुठल्याही सत्संगाला न जाता साधनेचे योग्य दृष्टीकोन असणे : देवद आश्रमात असतांना ती साधकांच्या साधनेविषयीच्या प्रश्नांना चांगली उत्तरे द्यायची. प्रत्यक्षात ती कधी सत्संगाला गेली नव्हती किंवा तिने कधी ग्रंथवाचनही केलेले नव्हते. ही सगळी उत्तरे तिला आतून सुचायची.

५ आ. कु. वैदेहीचा श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव : वैदेही देवद आश्रमात वास्तव्यासाठी आल्यावर तिचा श्रीकृष्ण आणि परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्याप्रती असलेला भाव लक्षात आला. त्यांची चित्रे खोक्यात ठेवून ती आश्रमात जिथे जाईल, तिथे समवेत तो खोका घेऊन जायची आणि सेवा करतांना ती चित्रे समोर ठेवायची. याच कालावधीत तिने अनेक कविता केल्या होत्या. (कु. वैदेहीने केलेल्या काही कविता अगोदर छापून आल्या आहेत.) त्यातून तिचा भाव अधिक प्रमाणात असल्याचे लक्षात आले.

६. आईचा विरोध असतांनाही कु. वैदेहीने स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून पूर्ण वेळ साधनाच करण्याचा निर्णय घेणे आणि महाविद्यालयीन शिक्षण सोडणे

देवद आश्रमात वास्तव्याला आल्यावर २ – ३ मासांतच तिला ‘पूर्णवेळ साधना करावी’, असे वाटायला लागले. त्याप्रमाणे तिने वार्षिक परीक्षेसाठी केवळ २ मासच राहिले असतांना शिक्षणाचा विचार न करता पूर्णवेळ साधना करण्याचा चांगला निर्णय घेतला. वैदेहीने पूर्णवेळ साधना करण्यासाठी तिच्या आईचा विरोध होता. ‘वैदेहीने आधी शिक्षण पूर्ण करावे आणि नंतर साधनेचा विचार करावा’, असे सौ. मीनलला (पत्नीला) वाटत होते; परंतु वैदेही स्वत:च्या निर्णयावर ठाम असल्याने तिने महाविद्यालयीन शिक्षण सोडून पूर्णवेळ साधना करण्यास प्रारंभ केला.

७. महाविद्यालय सोडतांना आलेल्या अडचणी आणि अनुभवलेली गुरुकृपा !

७ अ. महाविद्यालय सोडतांना एका प्राध्यापिकेने विरोध करणे; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांची माहिती आणि त्यांची ग्रंथसंपदा पाहिल्यावर तिला प्राचार्यांकडून अनुमती मिळणे : वैदेहीला महाविद्यालय सोडतांना कार्यालयातून अनुमती मिळत नव्हती; कारण त्यांची पुढील दोन वर्षांची हानी होणार होती. (विद्यार्थी २ वर्षांनंतर मध्येच सोडून गेल्यावर त्याचे पुढील २ वर्षांचे शुल्क मिळत नाही); परंतु परम पूज्य डॉक्टरांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) माहिती, सनातन संस्थेचे कार्य आणि ग्रंथसंपदा दाखवल्यावर ज्या प्राध्यापिका तिला महाविद्यालय सोडण्यास विरोध करत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘मी स्वतः प्राचार्यांना जाऊन सांगते.’’ आणि त्याप्रमाणे त्यांनी प्राचार्यांकडे जाऊन अनुमती घेतली.

७ आ. प्राध्यापिकेने सनातन संस्थेला स्वतःकडील आध्यात्मिक ग्रंथ भेट देणे : त्या प्राध्यापिकेने त्यांच्याकडे असलेले अध्यात्मावरील एक मोठा खोका भरून ग्रंथ आश्रमाला भेट दिले. यात ४ वेद आणि अन्य मोठे ग्रंथ होते.

७ इ. लक्षात आलेला योगायोग ! : त्या प्राध्यापिकेचे आडनाव ‘देव’ होेते. ‘देवानेच (परात्पर गुरुदेवांनीच, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) त्याचे एक रूप तिथे पाठवून वैदेहीला साहाय्य केले’, असे माझ्या लक्षात आले; अन्यथा पुढील २ वर्षांचे ३ – ४ लाख रुपये शुल्क भरल्यानंतरच त्यांनी तिला महाविद्यालयातून सोडले असते.

यावरून ‘परम पूज्य डॉक्टर साधकांचे साधनेतील अडथळे कसे अलगद दूर करतात आणि टप्प्याटप्प्याने कसे पुढे घेऊन जातात ? घरच्यांच्या विरोधाला तोंड देण्यासाठी बळ कसे देतात ?’, हे माझ्या लक्षात आले.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा आणि त्यांची कृपा यांमुळे मायेपासून अलिप्त असणे

८ अ. कु. वैदेही पूर्णवेळ साधना करू लागल्यावर आईला सोडून गोवा येथील आश्रमात जातांना भावनाशील न होणे : लहानपणापासून मार्च २०१३ मध्ये शिक्षण सोडेपर्यंत ती तिच्या आईच्या समवेतच रहात होती; परंतु शिक्षण सोडून पूर्णवेळ साधना अन् सेवा करण्यासाठी गोवा येथील आश्रमात जातांना ती आईविषयी भावनाशील झाली नाही.

८ आ. आईची काळजी न वाटणे : वैदेही रामनाथी येथे सेवेसाठी गेल्यावर सौ. मीनल ठाणे येथील घरी एकटीच रहायची. एकदा मी वैदेहीला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘तुला आईची काळजी वाटते का ?’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘मला काळजी वाटत नाही. परम पूज्य डॉक्टर आणि श्रीकृष्ण तिची काळजी घेतील.’’

८ इ. महाविद्यालयाच्या मायेत न गुंतणे : एकदा मी तिला विचारले, ‘‘तुला महाविद्यालयाची किंवा तिथल्या मैत्रिणींची आठवण येते का ? तू त्यांना भ्रमणभाष करतेस का ?’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘मला कुणाचीही आठवण येत नाही. महाविद्यालय सोडल्यावर मी कोणत्याही मैत्रिणीला कधीही संपर्क केला नाही.’’ तिचे हे वागणे मला फारच वैशिष्ट्यपूर्ण वाटले.

८ ई. कु. वैदेही लहान असतांना वडिलांनी स्वातंत्र्य सैनिकांची गोष्ट सांगितल्यावर तिने ‘वडिलांनी घरी यावे’, असा हट्ट न करणे : ‘आपले वडील साधना करतात’, याचा तिला अभिमान होता. मी दक्षिण किंवा उत्तर भारतात प्रसारासाठी असतांना (वर्ष २००८ ते वर्ष २०१० या काळात) मला तिचा दूरभाष यायचा. त्या वेळी ती मला विचारायची, ‘‘तुम्ही घरी कधी येणार ?’’ तेव्हा मी तिला स्वातंत्र्यसैनिकांच्या गोष्टी सांगायचो. ‘‘त्यांनी राष्ट्रासाठी किती त्याग केला आहे ? कित्येक मास आणि वर्षे ते एका गावातून दुसरीकडे नंतर तिसरीकडे, तर कधी जंगलात रहायचे. ते त्यांच्या घरापासून कित्येक वर्षे दूर रहायचे; कारण त्यांना राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते. तसेच आपल्यालाही करायचे आहे. स्वातंत्र्य मिळालेल्या या राष्ट्राला आपल्याला आदर्श असे ईश्वरी राज्य बनवायचे आहे. त्यासाठी हा तुझा अन् माझा त्याग आहे. तुला या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे.’’

८ ई १. वडिलांनी घरी येण्याची अपेक्षा न ठेवता केवळ परीक्षेच्या वेळी वडिलांना दूरभाष करण्यास सांगणारी वैदेही ! : गणपति उत्सव सोडून मी अन्य कुठल्याही सणाला घरी नसायचो. तिची माझ्याकडून एकच अपेक्षा असायची. ती मला म्हणायची, ‘‘माझी शाळेची परीक्षा असेल, तेव्हा परीक्षेच्या दिवशी तुम्ही मला दूरभाष करा. तुमच्याशी बोलल्यावर मला बरे वाटते.’’ त्यामुळे मी न चुकता तिच्या परीक्षेच्या कालावधीत तिला दूरभाष करायचो.

९. दूरदर्शीपणा

आम्ही गोवा येथे घर घेतल्यावर तेथे वाहतूक व्यवस्था नसल्याने ‘स्वतःचे वाहन घ्यावे लागेल’, हे लक्षात घेऊन ती आधीच चारचाकी वाहन चालवायला शिकली. गुरुकृपेने ती आता पुष्कळ आत्मविश्वासाने वाहन चालवते.

१०. अभ्यासू वृत्ती

तिला एखाद्या विषयाचा अभ्यास करायला पुष्कळ आवडतो. तिला त्याचा अजिबात कंटाळा नाही. त्याचा लाभ तिला वैद्यकीय सेवा करतांना झाला. त्यामुळे ती नवीन नवीन उपचारांच्या पद्धती, उदा. ‘चुंबक चिकित्सा, न्यूरोथेरेपी, बिंदूदाबन आणि मर्मचिकित्सा’ यांसारख्या उपचारपद्धती पुष्कळ लवकर शिकली.

११. नियोजनकौशल्य

ती विविध वैद्यकीय सेवांचे चांगल्या प्रकारे नियोजन करते आणि त्या संदर्भातील सत्संगात ती या कृती पुष्कळ संयमाने आणि अभ्यासपूर्ण करते.

१२. कु. वैदेहीमधील प्रेमभावामुळे रुग्ण साधकांना तिचा आधार वाटणे

तिच्यामध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यामुळे आश्रमातील लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सगळ्यांची ती लाडकी आहे. सर्व साधकांना समजून घेऊन सेवांचे नियोजन करतांना तिला या गुणाचा पुष्कळ लाभ होतो. सध्या ती रामनाथी, गोवा येथे रुग्णांची सेवा अतिशय आवडीने आणि प्रेमाने करते. रुग्ण साधकांना तिच्या बोलण्याने आधार वाटतो.

१३. पालट

१३ अ. समंजसपणा वाढणे : आरंभी वैदेहीचे तिच्या आईशी वाद व्हायचे; परंतु आता वैदेहीने आईची प्रकृती पूर्णपणे स्वीकारली आहे. आता वैदेही आईला समजून घ्यायला लागली आहे. त्यामुळे आता त्या दोघींमध्ये वाद होत नाहीत. आई सांगेल, तसे ती आता पूर्णपणे, शांतपणे आणि कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता ऐकते. हा तिच्यातील पालट लक्षणीय आहे.

१४. कृतज्ञता

परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा तिला सत्संग लाभतो. तेव्हा ‘त्यांनी तिच्यातील साधनेचे बीज वृद्धींगत केले आहे’, असे मला वाटते. त्यासाठी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

लहानपणापासून वैदेहीला ‘सूक्ष्मातील कळत असणे आणि महाविद्यालयात शिकत असतांना तिचा अकस्मात् पूर्णवेळ साधना करण्याचा ठाम निर्धार होणे’, हे तिला कसे जमले ?’, हे आता आमच्या लक्षात आले. ‘परम पूज्य डॉक्टरांनी तिचा जन्म साधना करण्यासाठीच आहे’, हे तिच्या आणि आमच्या लक्षात आणून दिले. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल (२०.१२.२०२१)

होईल मग मीलन जिवाचे शिवात्म्याशी ।

आतुरलेल्या या जिवाला ।

कधी घेशील रे तू चरणांशी ।। १ ।।

वाट पाहे हा जीव ।

तुझ्या चरणांशी येण्यासी ।। २ ।।

घे तू लवकर या जिवाला ।

तुझ्या कृपेच्या छत्रछायेखाली ।। ३ ।।

होईल मग मीलन ।

जिवाचे शिवात्म्याशी ।। ४ ।।

– कु. वैदेही राजेंद्र शिंदे (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची कन्या), (११.४.२०१४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.