नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती !

नरेंद्र पाटील

मुंबई – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र तथा माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. १९ ऑक्टोबर या दिवशी मुंबईतील कार्यालयात नरेंद्र पाटील यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार पुन्हा स्वीकारला. या पदाला मंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला आहे. याविषयीचा अध्यादेश शासनाच्या नियोजन विभागाने काढला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतांना देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०१८ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्जीवित केले. तसेच या महामंडळाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नेमणूक केली होती. त्या वेळी नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजातील तरुण-तरुणींना महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करून त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित केले. महामंडळाचे अध्यक्ष असतांना वर्ष २०१८ ते वर्ष २०२० या कालावधीमध्ये त्यांनी ५० सहस्र मराठा उद्योजक सिद्ध केले होते. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची महामंडळावर पुनर्नियुक्ती करून काम करण्याची संधी दिली आहे. या नियुक्तीविषयी नरेंद्र पाटील म्हणाले की, मराठा समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या तरुण-तरुणी यांना महामंडळाद्वारे योजनांचा लाभ मिळवून देऊन उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.