‘हुकूमशाही नाकारा’ : चीनसह जगभरात शी जिनपिंग यांच्याविरोधात अभूतपूर्व आंदोलन चालू !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

बीजिंग (चीन) – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची सलग तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याविरोधात चीनमध्ये आंदोलन चालू करण्यात आले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये हे आंदोलन पसरत आहे. ‘हुकूमशाही नाकारा’ अशा प्रकारचे साम्यवादी सरकारच्या विरोधात नारे लावण्यात येत आहेत.

१. ‘व्हॉईस ऑफ सीएन्’ हा लोकशाहीचे समर्थन करणारा अज्ञात चिनी नागरिकांचा एक गट असून त्यांचे इन्स्टाग्राम खाते आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, या खात्यावरून त्यांनी जवळपास ८ चिनी शहरांमध्ये आंदोलन चालू केले आहे. यामध्ये राजधानी बीजिंगसह हाँगकाँगचाही समावेश आहे. तसेच हे आंदोलन आता जपान, दक्षिण कोरिया, तैवान, अमेरिका आणि इतर ठिकाणीही पोचले आहे. २०० हून अधिक विद्यापिठांमध्ये या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. त्याद्वारे जिनपिंग यांना हटवण्याची मागणी होत आहे.

२. जिनपिंग यांच्याविरोधातील घोषणाबाजीची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ या गटाकडे येत आहेत. अनेक घोषणा स्नानगृहामध्ये लिहिण्यात आल्या असून काही शाळेतील सूचना फलकावर लावण्यात आल्या आहेत.

३. चीनमध्ये जिनपिंग यांच्याविरोधात जाहीरपणे आंदोलन केल्यास कारावासाची शिक्षा होऊ शकते. बीजिंगमधील पुलावर जिनपिंग यांच्याविरोधात ‘शी जिनपिंग महान नेते नाहीत’, असे भित्तीपत्रक लावल्यानंतर सरकारने संबंधित व्हिडिओ आणि भित्तीपत्रक यांवरील शब्दांवर बंदी घातली आहे. देशभरातील इंटरनेटवरही या शब्दांवर बंदी लादण्यात आली आहे.