संभाजीनगर येथे युवा महोत्सवात सीतेच्या तोंडी ‘लावणी’ घातल्याने अभाविपने सादरीकरण बंद पाडले !

प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू ! – कुलगुरु

संभाजीनगर – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या युवा महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी १७ ऑक्टोबरच्या रात्री रामायणातील ‘प्रहसना’च्या सादरीकरणात सीतामातेच्या तोंडी ‘लावणी’ची वाक्ये घातल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविपने) सादरीकरण बंद पाडले. (हिंदूंच्या देवतांचे विडंबन होत असल्याचे लक्षात येताच तात्काळ सादरीकरण बंद करणार्‍या अभाविपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – संपादक) त्यामुळे वाद निर्माण झाला. भावना दुखावणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अभाविपने कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे केली. ‘प्रहसन’ हा नाट्यशास्त्राचा प्रकार आहे. यात हस्यरसाला महत्त्व दिले जाते आणि त्याद्वारे उपदेश केला जातो. झालेल्या प्रकाराविषयी नाट्यशास्त्राच्या संघातील विद्यार्थ्यांनी ‘विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागा’चे संचालक संजय संभाळकर यांच्याकडे क्षमा मागितली, तर ‘या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू’, असे कुलगुरु डॉ. येवले यांनी सांगितले.

१. ज्येष्ठ रंगकर्मी रमाकांत भालेराव यांनी लिहिलेल्या  ‘www.रामायणा.com’ या ‘प्रहसना’ला यापूर्वी राज्यपाल कार्यालयाच्या घेण्यात येणार्‍या ‘इंद्रधनुष्य’ आणि ‘पश्‍चिम विभागीय महोत्सवा’त सुवर्णपदक पारितोषिक मिळालेले आहे.

२. युवा महोत्सवात त्याचे सादरीकरण विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचे ६ कलावंत करत होते. सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका साकारणार्‍या २ कलाकारांमध्ये संवाद चालू होता. त्या वेळी सीतेच्या तोंडी ‘झाल्या तिन्ही सांजा…’ हे लावणी गीत देण्यात आले आणि या गीतावर ती नृत्य करत असल्याचे दाखवण्यात आले.

३. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उपस्थित अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेत हे सादरीकरणच बंद पाडले.

४. ‘प्रहसनातून विडंबनात्मक मांडणी केली जात असते. प्रहसन आणि नाटक यांतील भेद समजून घ्यायला हवा; पण काही जणांनी गोंधळ घातल्याने १० मिनिटांच्या सादरीकरणातून जो सामाजिक संदेश द्यायचा होता तो देता आला नाही. आम्हाला सादरीकरणाची पुन्हा संधी मिळाली पाहिजे,’ असे कलावंतांनी सांगितले.

(एकीकडे सामाजिक संदेशाच्या नावाखाली सीतामातेचे विडंबन करायचे आणि दुसरीकडे पुन्हा सादरीकरण करण्याची मागणी करायची, अशी दुटप्पी भूमिका घेणारे कलावंत हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणाला कुलगुरूंनी अनुमती न देणे हेच योग्य आहे. – संपादक)

चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू !

कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले, ‘‘या प्रकरणाची नोंद विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे. या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक सांभाळकर यांना दिले आहेत. याचा वस्तूनिष्ठ अहवाल सादर झाल्यानंतर तो पडताळून दोषींवर कारवाई करण्यात येईल.’’

संपादकीय भूमिका

इस्लामी राष्ट्रांत कुणी महंमद पैगंबर किंवा कुराण यांचा चित्रपट, नाटक, वेबसिरीज आणि सामाजिक माध्यम यांतून अवमान केला, तर त्याला थेट मृत्यूदंडाची शिक्षा केली जाते. ख्रिस्ती राष्ट्रांत येशू किंवा बायबल यांचा अवमान केल्यास त्याला कठोरात कठोर शिक्षा होते. याउलट हिंदूबहुल; पण ‘निधर्मी’ भारतात कुणीही ऊठसूठ हिंदूंच्या देवतांची टिंगळटवाळी करतो, मूर्ती फोडतो, हिंदूंचे धर्मग्रंथ जाळतो, वेबसिरीज, चित्रपट, नाटके यांच्या माध्यमांतून देवतांचे विडंबन करतो; पण त्याविषयी कठोर कारवाई मात्र होत नाही.