पाकिस्तानच्या ‘एफ्-१६’ लढाऊ विमानांच्या नूतनीकरणाच्या व्यवहाराला अमेरिकेच्या एकाही खासदाराचा विरोध नाही !

भारताच्या विरोधाचा अमेरिकेवर परिणाम नाही !

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तानला सैनिकी साहाय्य थांबवण्याचा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय गेल्या मासामध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्थगित केला होता. त्यानंतर ८ सप्टेंबरला गृहमंत्रालयाने अमेरिकी संसदेला पाकिस्तानला यापूर्वी दिलेल्या ८२ ‘एफ्-१६’ विमानांच्या नूतनीकरणाविषयीच्या व्यवहाराची माहिती दिली होती. ३० दिवसांच्या मुदतीमध्ये १०० खासदारांपैकी एकानेही यावर आक्षेप नोंदवला नसल्यामुळे पाकिस्तानला ४५० दशलक्ष डॉलर्सचे (३ सहस्र ५८१ कोटी रुपयांचे) हे साहाय्य देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताने यापूर्वीच या साहाय्यावर आक्षेप घेत अमेरिकेकडे निषेध नोंदवला होता.

१. अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ‘पाकिस्तान हे धोकादायक राष्ट्र आहे’, असे विधान केले होते; मात्र त्यानंतरही पाकला लढाऊ विमाने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याविषयीही आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

२. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या आतंकवादविरोधी लढ्यात एफ्-१६ विमानांचे साहाय्य होणार असल्याचा बायडेन प्रशासनाचा दावा अजब असल्याचेही दाखवून दिले होते. ‘आतंकवाद्यांशी लढण्यासाठी एफ्-१६ सारख्या अद्ययावत लढाऊ विमानांचे साहाय्य कसे होणार ?’, याचे उत्तरही बायडेन प्रशासनाने अद्याप दिलेले नाही.

संपादकीय भूमिका

  • यातून अमेरिकेचा दुटप्पीपणा स्पष्ट दिसून येतो. अमेरिका हा विश्‍वास ठेवण्यासारखा देश नाही, हे जगाला पुन्हा एकदा लक्षात आले आहे. त्यामुळे भारतानेही अमेरिकेशी तसाच व्यवहार करणे आवश्यक आहे !
  • जिहादी पाकला साहाय्य करणार्‍या अमेरिकेलाच कुणी ‘आतंकवादी’ म्हटले, तर आश्‍चर्य वाटू नये !