बिहारमध्ये सातवीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये काश्मीरचा वेगळा देश म्हणून उल्लेख

किशनगंज (बिहार) – जिल्ह्यातील काश्मीरविषयी एक वादग्रस्त प्रकरण समोर आले आहे. इयत्ता सातवीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये काश्मीरचा वेगळा देश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणावरून वाद वाढला आहे. येथील एका शाळेचे मुख्याध्यापक एस्.के. दास यांनी ही मानवी चूक असल्याचे सांगितले. बिहार शिक्षण मंडळाने ही चूक लक्षात आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. ‘काश्मीरच्या लोकांना काय म्हणतात ?’, हा प्रश्‍न विचारायचा होता; मात्र चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आले की, काश्मीर देशातील लोकांना काय म्हणतात ? ही मानवी चूक होती, असे त्यांनी सांगितले. (अशा घटनेकडे मानवी चूक म्हणून दुर्लक्ष न करता हा प्रश्‍नपत्रिका सिद्ध करणार्‍या शिक्षकाची मानसिकता तपासावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे ! – संपादक)

१. बिहार शिक्षण प्रकल्प परिषदेने घेतलेल्या इयत्ता सातवीच्या सहामाही परीक्षेत वादग्रस्त प्रश्‍न विचारण्यात आला होता की, खालील देशांतील लोकांना काय म्हणतात ? खाली दिलेल्या पर्यायांमध्ये चीन, नेपाळ, इंग्लंड, भारत आणि काश्मीर असे पर्याय देण्यात आले होते. (अशी प्रश्‍नपत्रिका सिद्ध करणारे शिक्षक मुलांना वर्गांत काय शिकवत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)

२. किशनगंज येथील इयत्ता सातवीच्या पश्‍नपत्रिकेत काश्मीर हा वेगळा देश सांगितल्याने भाजपने राज्य सरकारवर टीका केली. ‘बिहार सरकार आणि बिहार सरकारचे अधिकारी काश्मीरला भारताचा भाग मानत नाहीत, हे या प्रश्‍नावरून सिद्ध होते’, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल म्हणाले.