नोएडा (उत्तरप्रदेश) येथे कुत्र्यांच्या आक्रमणात ७ मासांच्या मुलाचा मृत्यू

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील लोटस बुलेवार्ड सोसायटीतील कुत्र्यांनी ७ मासांच्या अरविंद नावाच्या मुलावर आक्रमण करून त्याचे पोट फाडले. यामुळे त्याची आतडी बाहेर पडली. सोसायटीच्या रहिवाशांनी त्याला तातडीने रुग्णालयात भरती केले; मात्र शस्त्रकर्मानंतरही त्याला वाचवण्यात यश मिळू शकले नाही. या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांनी बाहेर येऊन प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या भागात नेहमीच कुत्रे  चावल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुलांसह नागरिकही खाली जाण्यास घाबरत आहेत.

१. येथील सेक्टर -११० मध्ये राजेश आणि सपना दांपत्य रहातात. सपना त्यांच्या मुलासोबत लोट्स बुलेवार्ड सोसायटीच्या बागेमध्ये आल्या होत्या. त्यावेळी टॉवर-३० लगत कुत्र्यांनी मुलाला घेरले. कुत्र्यांनी मुलावर आक्रमण केले, तेव्हा सपना तेथेच होत्या. त्यांनी मुलाला कुत्र्यांपासून सोडवेपर्यंत त्यांनी त्याला अनेक ठिकाणी चावले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

२. सोसायटीच्या रहिवाशांनी सांगितले की, काही दिवसापूर्वीच नगरपालिकेने श्‍वानांचे निर्जंतुकीकरण केले होते. त्यानंतर त्यांना परत येथेच सोडण्यात आले. यामुळे समस्या सुटलीच नाही. उलट या मुलाचा बळी गेला. कुत्र्यांच्या भीतीमुळे आम्ही आमच्या मुलांना घराबाहेर खेळण्यास जाऊ देत नाही. मागील ३ वर्षांपासून आम्ही या कुत्र्यांचा त्रास सहन करत आहोत. प्रत्येक २ मासांनी हे कुत्रे कुणाला तरी चावतात. ते नरभक्षक झाले आहेत. नोएडा प्राधिकरणही कुत्र्यांना पकडण्यासाठी येत नाही. काही दिवसांपूर्वीच कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली; पण त्यांना पुन्हा येथेच सोडण्यात आले.

संपादकीय भूमिका

भटक्या कुत्र्यांमुळेच नव्हे, तर पाळीव कुत्र्यांमुळेही लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर आता कायमस्वरूपी आणि ठोस उपाय काढण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे !