मुंबई – अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मनसे कुणालाही पाठिंबा देणार नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. पाठिंब्यासाठी भाजपकडून आलेल्या विनंतीला धुडकावून लावत ‘भाजपनेच या निवडणुकीतून माघार घ्यावी’, असा सल्लाही ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. ‘याविषयी पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ’, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
पोटनिवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये म्हटले आहे, ‘दिवंगत आमदाराच्या घरची व्यक्ती निवडणूक लढवत असल्यास त्या विरोधात उमेदवार न देणे ही त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजली अर्पण करण्यासारखे आहे. त्यामुळे भाजपनेही त्यांचा उमेदवार मागे घ्यावा. ही निवडणूक लढवू नये.’
राज ठाकरे यांच्या पत्राचा विचार करू ! – उपमुख्यमंत्री
मुंबई – राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहिले असून आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू. राज ठाकरे यांचा पत्रावर मला निर्णय घ्यायचा असेल, तर मला पक्षातील सहकार्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. तसेच बाळासाहेबांची शिवसेनादेखील आमच्यासमवेत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही मला चर्चा करावी लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार्या श्रीमती लटके यांच्यासाठी ही जागा सोडण्याविषयी राज ठाकरे यांनी फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.