‘एकाच कुटुंबातील ३ संतांच्या हस्ताक्षरांना एकाच वेळी दैवी गंध येणे’, ही अध्यात्माच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय घटना !

प.पू. बाळाजी आठवले (प.पू. दादा)

१. प.पू. डॉक्टर, त्यांचे वडील आणि सर्वांत मोठे बंधू अशा एकाच कुटुंबातील तीन संतांच्या हस्ताक्षरांना एकाच वेळी दैवी गंध येणे

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २०.८.२०१३ या दिवशी एक अद्वितीय घटना घडली. प.पू. डॉक्टर खोलीत रात्री १० वाजता संगणकावर ग्रंथांच्या धारिका पडताळत होते. त्या वेळी तेथे दैवी गंध तीव्रतेने दरवळू लागला. तेथे असणार्‍या सर्व साधकांनाही तो जाणवला. ‘दैवी गंध कोठून येतो ?’, याचा शोध घेतल्यानंतर तो प.पू. डॉक्टर नोंदी करत असलेल्या कागदांना येत असल्याचे कळले.

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले

त्यानंतर काही क्षणांतच १८ वर्षांपूर्वी देहत्याग केलेले प.पू. डॉक्टरांचे वडील प.पू. बाळाजी आठवले (प.पू. दादा) यांनी अध्यात्मातील विविध विषयांवर लिखाण केलेल्या वह्यांनाही निराळा दैवी गंध येत असल्याचे लक्षात आले. दैवी गंधाचे प्रमाण पुष्कळ वाढले. त्याच वेळी सनातनचे २७ वे संत आणि प.पू. डॉक्टरांचे सर्वांत मोठे बंधू पू. डॉ. वसंत बाळाजी आठवले (आताचे सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले) (अप्पाकाका) यांनी ग्रंथात घेण्यासाठी पाठवलेल्या लिखाणालाही दैवी गंध येऊ लागला. हा दैवी गंध आधी आलेल्या २ दैवी गंधांपेक्षा निराळा होता आणि त्याचीही तीव्रता वाढू लागली. हे तिन्ही दैवी गंध १ घंटा खोलीत दरवळत होते.

‘एकाच कुटुंबातील ३ संतांच्या हस्ताक्षरांना दैवी गंध येणे’, ही केवळ सनातनच्याच नव्हे, तर अध्यात्माच्या इतिहासातीलही एकमेवाद्वितीय घटना आहे. आजपर्यंतच्या अध्यात्माच्या इतिहासात अशा प्रकारची नोंद कोठेही आढळली नसेल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२. अनुभूती

२ अ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत दरवळत असलेल्या दैवी गंधामुळे मस्तकाला झिणझिण्या येणे आणि दाब नष्ट होणे : ‘मी खोलीत सेवेसाठी गेलो असतांना माझ्या डोक्यावर दाब जाणवत होता आणि मस्तकाला झिणझिण्या येत होत्या. सेवेला आरंभ केल्यावर काही मिनिटांतच प.पू. डॉक्टरांच्या खोलीत दैवी गंध दरवळू लागला. तो सर्वत्र पसरताच माझ्या डोक्यावरील दाब आणि मस्तकाला येणार्‍या झिणझिण्या नष्ट झाल्या अन् मला शांत वाटू लागले.’

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.८.२०१३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक