खोटी देयके सिद्ध करून महावितरणची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद !

लातूर – खोटी देयके सिद्ध करून १ कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘मराठवाडा रेल कोच फॅक्टरी’साठी नवीन ३३ केव्ही लाईनच्या कामासाठी साहित्य खरेदी करण्यात आले होते. याची बनावट देयके सिद्ध करून महावितरणला देण्यात आली होती. ही देयके नंतर सरकारकडे संमतीसाठी पाठवण्यात आली होती.

‘श्री मोरया निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार हरिभाऊ बारकुल यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. या तक्रारीत मुकेश हिराचंद हेबाडे, जमीर अमीर पाशा शेख आणि सईद तकुल्ला सईद जफरुल्ला कादरी या तिघांनी संगनमत करून रेल कोच फॅक्टरीच्या ३३ केव्ही लाईनच्या कामामध्ये तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केली, तसेच वर्ष २०१९ ते नोव्हेंबर २०२२ या काळात खरेदी केलेल्या साहित्याची बनावट देयके सिद्ध करून घेतली, असे तक्रारीत म्हटले आहे.