भारतात ७० वर्षांनी ‘चित्ता युग’ आल्याची चर्चा होत आहे. त्याचा संबंध अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांची सांगड घालण्याशी जोडला गेला. ‘पर्यावरणपूरक पर्यटनात वाढ होत असल्याने रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मुंबईतील आरे वसाहतीला लागून असलेल्या निवासी परिसरात रात्रीच्या वेळेत बिबट्या फिरत असतो. भांडुप, मुलुंड, बोरिवली या मुंबईच्या उपनगरांतील डोंगराळ भाग म्हणजे बिबट्यांची वावरण्याची ठिकाणे आहेत. येथे त्याने कित्येकांना घायाळही केले आहे. तात्पर्य हेच की, ज्या मुंबई महानगरात माणसांची दाटी आहे, अशा ठिकाणी भक्ष्याच्या शोधात काही भागांत बिबट्या आजही फिरतो. गेली अनेक वर्षे हे चालू आहे. या ठिकाणी बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांना घेऊन पर्यावरणपूरक पर्यटन वाढीस लागू शकते का ? याचा अभ्यास व्हावा.
मुंबईचे रूपांतर सिमेंटचे जंगल आणि अलीकडे बाहेरून काचेचा दिखावा असलेल्या इमारतींत झाल्याने येथे झाडेझुडपे अपवादाने दृष्टीस पडतात. त्यामुळे आरे संकुलाच्या रूपाने जे काही वन्य क्षेत्र उपलब्ध आहे, त्याचा उपयोग वन्यजिवांच्या संवर्धनासाठी झाल्यास या शहराची ओळख पालटेल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात देश-विदेशांतून येणार्यांची संख्या अधिक आहे. हीच गर्दी वन्यजिवांना पहाण्यासाठी वळवली, तर ते महसूल मिळवून देणारे ठरेल. लोकांना या ठिकाणी आकर्षित करतांना निसर्गाविषयी नियमांची त्यांच्याकडून पायमल्ली होणार नाही, याकडे लक्ष असावे.
देशी गोवंशियांची संख्या अल्प होत आहे. जर्सी गायींची संख्या वाढत आहे. देशी गायींपासून मिळणारे दुग्धजन्य पदार्थ हे जर्सी गायींच्या दुग्धजन्य पदार्थांपेक्षा सर्वच मापदंडांवर कायमच अधिक सकस ठरले आहेत. रासायनिक खतांवर पिकलेले अन्नधान्य केवळ दिसायला धान्य असले, तरी त्यात कसदारपणा किती ? हा प्रश्नच आहे. त्यामुळे किमान देशी गायींच्या दुधातून तरी लोकांना सकस अन्न मिळावे. त्यासाठी देशी गोवंशियांची संख्या वाढली, तर त्यांचे दूध सर्वसामान्य लोकांना परवडणार्या दरात उपलब्ध होऊ शकेल. चित्त्याच्या साहाय्याने पर्यटन वृद्धीचा विचार होतांना देशी गोवंशियांच्या संवर्धनाचा विचार आवश्यक आहे. चित्ता, बिबटे आदींची उपयुक्तता पर्यटनाच्या दृष्टीने, तर देशी गोवंशियांची उपयुक्तता आरोग्य आणि अर्थकारणाच्या दृष्टीनेही आहे, हे नक्की !
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई