वर्ष २००८ मध्ये मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली जमावाने केले होते पणजी पोलीस ठाण्यावर आक्रमण ! – पोलिसांची न्यायालयात माहिती

पणजी, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – वर्ष २००८ मध्ये शासनातील विद्यमान मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली जमावाने पणजी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. विशेष म्हणजे हा मोर्चा मंत्री मोन्सेरात यांनीच आणला होता, अशी साक्ष पणजी पोलीस ठाण्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणाचे अन्वेषण करणारे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक तुषार लोटलीकर यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयाला ११ ऑक्टोबर या दिवशी सुनावणीच्या वेळी दिली.

मंत्री बाबूश मोन्सेरात

या सुनावणीच्या वेळी लोटलीकर यांनी मंत्री बाबूश मोन्सेरात, पणजी महानगरपालिकेचे महापौर टोनी रॉड्रिग्स आणि इतर या संशयितांचा आक्रमण करणार्‍या मोर्च्यात सहभाग असल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. या सुनावणीच्या वेळी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात आणि टोनी रॉड्रिग्स हे अनुपस्थित होते. न्यायालयाने सुनावणीच्या वेळी संशयित जेनिफर मोन्सेरात आणि टोनी रॉड्रिग्स यांच्यासह अन्य दोन संशयितांना १८ ऑक्टोबर या दिवशी होणार्‍या पुढील सुनावणीच्या वेळी उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले आहेत. पणजी पोलीस ठाण्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आतापर्यंत ३६ संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आक्रमणानंतर पोलिसांनी विद्यमान मंत्री बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात आणि त्यांचे समर्थक यांना कह्यात घेतले होते.

या घटनेला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. पणजी पोलीस ठाण्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी नोंद असलेला गुन्हा रहित करण्याची मागणी मंत्री बाबूश मोन्सेरात आणि जेनिफर मोन्सेरात यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडे एका याचिकेद्वारे केली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी याला आक्षेप घेत संबंधित खटल्याची सुनावणी जलद गतीने घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी केलेली मागणी मान्य करून गोवा खंडपिठाने या खटल्याची सुनावणी जलद गतीने घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार या प्रकरणाची आता जलद गतीने सुनावणी घेतली जात आहे. यामुळे सुनावणीच्या वेळी संशयितांनी न्यायालयात उपस्थित रहावे आणि त्यांना अनुपस्थित रहाण्याची मुभा दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. आता या प्रकरणी घटनेच्या वेळी पणजी पोलीस ठाण्यात सेवेसाठी असलेल्या पोलिसांच्या साक्षी नोंदवल्या जात आहेत. ११ ऑक्टोबर या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी चालू असतांना पणजी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक तुषार लोटलीकर यांची साक्ष नोंदवण्यात आली.