सोलापूर-देहली या मार्गावर नवीन रेल्वे धावणार !

सोलापूर – ‘हुबळी-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस’ला ११ ऑक्टोबरला संसदीय कार्यमंत्री, कोळसा आणि खाणमंत्री प्रल्हाद जोशी अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी सोलापूरमार्गे धावणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांसाठी नवी देहलीला जाण्यासाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे. सोलापूरकरांना देहली गाठण्यासाठी केवळ केके म्हणजेच ‘कर्नाटक एक्स्प्रेस’वर अवलंबून रहावे लागायचे. नवीन गाडी चालू झाल्यामुळे सोलापूरकरांची सोय झाली आहे.

ही गाडी हुबळी येथून २०६५७ या क्रमांकाने शुक्रवारी रात्री ११.५० वाजता निघेल आणि हजरत निजामुद्दीन स्थानकावर रविवारी सकाळी १०.४० वाजता पोचेल. तसेच हजरत निजामुद्दीन स्थानकावरून २०६५८ या क्रमांकाने रविवारी दुपारी ३.५५ वाजता सुटेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे असणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.