पुणे येथील श्री गौड ब्राह्मण समाज यांच्या दुर्गामाता मंदिरात नवरात्रीनिमित्त ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ अंतर्गत व्याख्यान

पुणे, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील श्री गौड ब्राह्मण समाज, बिबवेवाडी यांच्या दुर्गामाता मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व आणि या काळात होणारे अपप्रकार’ या विषयावर नुकतेच व्याख्यान घेण्यात आले. सिंहगड रस्ता येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोहरलाल उणेचा यांच्या समाजाचे हे मंदिर आहे. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी व्याख्यान आयोजित केले होते. हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्याख्यान झाल्यानंतर स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञाही घेण्यात आली. या वेळी २७५ जिज्ञासू उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा वितरण कक्षही येथे लावण्यात आला होता. कुंकू लावण्याचे महत्त्व समजल्यावर अनेक महिलांनी सनातनचे कुंकू विकत घेतले.

घोषणा देतांना उपस्थित जिज्ञासू

स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवतांना समितीचे कार्यकर्ते

समितीच्या कार्याने प्रभावित होऊन धर्मप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली

श्री. शैलेश मालुसरे यांनी समितीला भेट दिलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती

ज्या मंदिरात व्याख्यान झाले, त्याच्या शेजारील दुकानात असणार्‍या श्री. शैलेश मालुसरे आणि त्यांच्या पत्नी सौ. रूपाली मालुसरे यांनी स्वतःहून कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यक्रम पार पाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली. त्यांनी सांगितले की, शेजारीच माझे ‘फायबर’च्या मूर्तींचे दुकान आहे. मी आणि माझ्या पत्नीने दुकानात बसून तुमचे व्याख्यान ऐकले. यात सांगितलेल्या गोष्टी (आघात) मी स्वतः अनुभवले आहेत. तुम्ही पुष्कळ चांगले कार्य करत आहात, त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला ही महाराजांची मूर्ती भेट देत आहे. तुमच्या या कार्यात माझे कोणतेही साहाय्य लागले तर सांगा. मी योगदान द्यायला सिद्ध आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःहून ‘या कार्यासाठी अर्पण देऊ शकतो का?’ असे विचारले आणि अर्पण दिले.

वैशिष्ट्यपूर्ण

सन्मानचिन्ह देतांना डावीकडून पहिले समितीचे श्री. मनीष चाळके, दुसर्‍या समितीच्या कु. चारुशीला शिंदे, तिसर्‍या समितीच्या कु. क्रांती पेटकर, सन्मानचिन्ह देतांना श्री. मदन डांगी (अध्यक्ष, सिनिअर सिटीझन भाजप, पुणे आणि सरचिटणीस, पुणे शहर) उजवीकडून दुसरे श्री. दिनेशजी डांगी (श्री गौड ब्राह्मण समाज सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती अध्यक्ष), श्री. गणेशजी डांगी (उजवीकडून पहिले)

१. श्री गौड ब्राह्मण समाजाच्या वतीने हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी समितीला सन्मानचिन्ह दिले. या वेळी सिनीअर सिटीझन भाजप, पुणेचे अध्यक्ष आणि पुणे शहर सरचिटणीस श्री. मदन डांगी, श्रीगौड ब्राह्मण समाज सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष श्री. दिनेशजी डांगी, श्री. गणेशजी डांगी उपस्थित होते.

श्री गौड ब्राह्मण समाज यांच्या वतीने मिळालेले सन्मानचिन्ह

२. उपस्थित महिला सर्व विषय जिज्ञासेने ऐकत होत्या आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसादही देत होत्या. प्रवचन चालू असतांना मधेच पोलीस आयुक्त आणि त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या हस्ते देवीची पूजा झाली. तरी बहुतांश महिला जागेवरून उठल्या नाहीत.