‘पदपथांवर दुकान लावले जाणार नाही’, असे हमीपत्र घेऊनच फटाका व्यावसायिकांना अनुमती !

पुणे – महापालिकेच्या मोकळ्या जागेवर, तसेच खासगी मिळकतीमधील मोकळ्या जागा किंवा बंदिस्त जागा यांवर फटाक्यांच्या विक्रीच्या दुकानाला अनुमती देतांना ‘पदपथांवर दुकान लावले जाणार नाही’, असे हमीपत्र घेऊनच फटाका व्यावसायिकांना अनुमती देण्यात येईल, अशी चेतावणी पालिकेच्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. दिवाळीच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात फटाका आणि शोभेची दारू विक्री करण्यासाठी परवाने संमत केले जातात. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने महापालिकेच्या स्तरावर मान्य धोरणांची काटेकोर कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. पदपथ, तसेच रस्त्यांवर फटाका आणि शोभेची दारू यांच्या विक्रीचे दुकान उभारले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. अनधिकृत फटाका विक्रीचे दुकान पदपथ किंवा रस्त्यावर उभे करणार्‍यांवर गुन्हे नोंद करावेत, अशा दुकानदारांना पुढील वर्षी परवाने दिले जाऊ नयेत, असेही या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.