पुणेकरांना पुढील ७ मास रस्ते खोदाईला सामोरे जावे लागणार !

पुणे – पावसाळा संपल्यानंतर समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण आणि पथ विभागाची कामे, तसेच खासगी आस्थापनेही रस्ते खोदाई करणार आहेत. बहुतांश भागात खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण यांसाठी १०० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. बी.एस्.एन्.एल्. (भारत दूरसंचार निगम लिमिटेड), एम्.एन्.जी.एल्. (गॅस), महावितरण अशा शासकीय आणि निमशासकीय यंत्रणाही रस्ते खोदणार आहेत. महापालिकेच्या विभागांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे एकच रस्ता सातत्याने खोदला गेल्याची वस्तूस्थिती या निमित्ताने समोर आली आहे. शहरात १ सहस्र ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यांपैकी १ सहस्र २०० किलोमीटर लांबीचे रस्ते विविध कारणांनी गेल्या वर्षभरात खोदल्याची माहिती महापालिकेच्या पथविभागाने दिली आहे. एका बाजूला रस्ते पूर्ववत् करण्याची प्रक्रिया चालू असतांना दुसरीकडे रस्ते खोदाईचे चित्र दिसणार आहे.

संपादकीय भूमिका 

वारंवार रस्त्यांची खोदाई का केली जाते ? हे पहाणे आवश्यक आहे. यामध्ये नियोजनाचा अभाव आणि कामाविषयी अनास्था तर नाही ना ? हेही पहायला हवे.